शुक्रवार, १० एप्रिल, २०१५

मराठी शिकवा मराठी टिकवा

परदेशात राहणाऱ्या मराठी लोकांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्याचबरोबर नवीन पिढी ही भारताबाहेर वाढत आहे. मात्र भारताबाहेर राहणाऱ्या ह्या मराठी कुटुंबांमधील पुढच्या पिढीत सर्वात मोठी उणीव जाणवते ती म्हणजे आपल्या मराठी मातृभाषेची. आणि त्यामुळे आपली मराठी भाषा पुढच्या पिढीत टिकेल की नाही अशी दाट शंका वाटते. ह्या मुलांना जर आपल्या मातृभाषेचे महत्व कळलेच नाही व तिच्याबद्दल आत्मीयता वाटलीच नाही तर पुढच्या एक दोन पिढ्यांमध्येच ही भाषा एकेका परीवारामधून नष्ट होईल ह्या गोष्टीची भीती वाटते.

प्रत्येकजण जगाच्या पाठीवर कोठेही असो, आपल्या संस्कृतीचा वारसा पुढे टिकवायचा प्रयत्न करत असतो. त्याची उदाहरणे म्हणजे- मुलांना प्रसंगानुसार आपल्या पद्धतीचे कपडे घालून नटवणे, आपले सणवार जमेल त्या प्रमाणात साजरे करणे, आपल्या पद्धतीचे जेवणातील पदार्थ बनविणे, वगैरे. त्याचप्रमाणे, आपली भाषा शिकवणे हे ही आपली संस्कृतीच पुढे चालू ठेवण्याचा एक महत्वपूर्ण भाग आहे, असे मला वाटते.

मातृभाषेतूनच समभाषिकांशी जवळचा संवाद साधता येतो, ज्यामुळे आपुलकी व जवळीक वाढते. मला आठवते तेंव्हा आम्ही अमेरिकेतील Niagara Falls येथील Maid of the Mist या बोटीत चढत असताना एक African American माणूस बोटीत बसणाऱ्या प्रवाश्यांशी, त्यांची भाषा ओळखून, त्यांना त्यांच्याच भाषेत अभिवादन करीत होता. त्याने जेंव्हा हिंदीत “नमस्ते, आप कैसे हैं ?” असे विचारले, तेंव्हा क्षणिक का होईना कुठेतरी मैत्री व आपुलकी जाणवली. तसेच परदेशात बाहेर फिरत असताना कुठेही आपली मातृभाषा कानावर पडली की नजर फिरून त्याच दिशेने बघते व कान टवकारले जातात . कारण तेच - कुठे तरी समता दिसल्याने ओढ जाणवते. मग ती नुसती भाषेचीच असली तरीही. आपली मातृभाषा म्हणजे नैसर्गिकरीत्याच आपल्याला मिळालेला एक अनमोल वारसा आहे, ज्या पासून आपल्या मुलांना जर आपण वंचित ठेवले तर त्यांना आपल्या संस्कृतीपासून लांब ठेवल्यासारखेच आहे.


भाषा शिकल्याने मराठी साहित्य, मराठी नाटकं, सिनेमे, गाणी, बघता/ वाचता/ ऐकता येतात. परंतु मुलांना भाषा येत नसली तर ह्या सगळ्या गोष्टींचा आनंदही घेता येत नाही. साहित्यामधून, संगीतामधून, नाट्यकलेमधून, आपली वागणूक, आपली संस्कृतीच दिसून येते व मुले ती नकळत आत्मसात करतात. त्यामुळे आपली संस्कृती जर पुढे टिकवायची असेल तर आपली भाषा शिकवायचा आग्रह असायलाच हवा. त्यासाठी आपली भाषा येणे हे नुसते अत्यावश्यकच नाही तर मुलांना भाषा शिकविण्यापासून तर सुरवातच व्हायला हवी.

बहुतांश परिवारांमध्ये आपली संस्कृती पुढे चालू राहावी, याची धडपड चालू असते. पण आपली भाषा, जी संस्कृतीचाच इतका महत्वपूर्ण भाग आहे, ती मुलांना शिकवायचे प्रयत्न मात्र तितकेसे दिसून येत नाहीत. उलट मुलांना पुढे अवघड जाऊ नये म्हणून अगदी जन्मापासूनच पालक मुलांशी मातृभाषा सोडून स्थानीय भाषेतच बोलायला सुरुवात करतात. याचे परिणाम -

१. आई वडील, आजी आजोबा, एकमेकांशी बोलत असताना मुलांना त्यातले पुष्कळसे संभाषण समजतच नाही व त्यात भाग घेता येत नसल्यामुळे ती उठून दुसऱ्या खोलीत जातात. त्यांना आपण कुटुंबातल्या इतर मंडळींपेक्षा वेगळे असल्याची जाणीव होते. मुले स्वतःला परिवारातला एक हिस्सा मानेनाशी होतात.

२. काही दिवसांनी भारतात राहणाऱ्या इतर नातेवाईकांशी संभाषण जमेनासे होते कारण त्यांना मुलांचे व मुलांना त्यांचे बोलणे नीट कळत नाही. आपल्या मनातले विचार नीट व सविस्तरपणे सर्वांपर्यंत पोचविता येत नाहीत. शेवटी मुले काका काकू, मामा, मावशी, आत्या व चुलत, मावस, मामे, आत्ते भावंडांशी बोलणेच टाळतात. नातलागांना भेटल्यावर मराठी भाषेत केला जाणारा हास्य विनोद, थट्टा मस्करी न समजल्या मुळे परिवारातील त्या विलक्षण अश्या आनंदाला मुकतात. जसे परिवारांमध्ये “Family Traditions”, “Family Jokes”, “Family Dance”. “Family Foods” असतात, त्याच प्रमाणे “Family Language” म्हणजेच एक भाषा असण्याची मजा ही निराळीच असते.

३. मोठे झाल्यावर समाजात “तुमची मातृभाषा कोणती?” असे विचारले गेल्यास “ माझी मातृभाषा मराठी” असे सांगावे की नाही, असे त्यांना वाटते. कारण “माझी मातृभाषा मराठी” असे सांगायचे खरे, पण ती मला बोलता, वाचता किंवा लिहिता मात्र येत नाही, असे कसे सांगायचे, याची त्यांना लाज वाटते आणि स्वतःचीच ओळख हरवल्या सारखे होते.

ESL (English as a Second Language) ह्या प्रोग्राम मध्ये शिकाविणाऱ्यांचे असे संशोधन आहे की जी मुले आपली मातृभाषा चांगली शिकतात व शिकत राहतात त्यांना कुठलीही भाषा अतिशय चांगली व पटकन आत्मसात करता येते. त्याचे कारण असे की मूल जेंव्हा लहान असते व त्याला कुठलीच भाषा येत नसते तेंव्हा फक्त आई वडिलांचे बोल ऐकूनच ते संवाद साधायला शिकत असते. त्यामुळे नुसते स्वरोच्चारण ऐकून त्याचा अर्थ ओळखण्याची जी कला आहे (Cognitive Skill) ती ते मूल सर्वप्रथम आपल्या मातृभाषेतूनच उत्कृष्टपणे शिकते. आणि पुढे मोठे झाल्यावर तेच कौशल्य वापरून ते दुसरी कुठलीही भाषा पटकन शिकू शकते. तसेच दुसरी भाषा शिकताना नवीन शब्दांचे अर्थ संदर्भावरून ओळखणेही (Context Clues) त्याला पटकन जमते.

मला तीन मुले असून ती सध्या अमेरिकेत वाढत अहेत. त्यांच्याशी बोलताना मी नेहमी मराठीतच बोलते. किंबहुना असे म्हणीन की त्यांच्याशी बोलताना मराठी भाषाच माझ्या तोंडातून सहज बाहेर पडते. ही माझी सवय मोडायचा मी कधीच प्रयत्न केला नाही. पहिल्या मुलाला Pre-School मध्ये प्रवेश घेताना, इंग्रजी माध्यमाच्या शाळेत त्याचा कसा काय निभाव लागेल, याची थोडी काळजी वाटत होती.पण ही माझी काळजी शाळेतल्या शिक्षकांना सांगितल्यावर मात्र, कोणीच मला “आपली मातृभाषा सोडून मुलाशी सतत English मध्येच बोला”, असा सल्ला दिला नाही. उलट “मुलं कुठलीही भाषा जी सतत त्यांच्या कानावर पडत रहाते, ती पट्दिशी शिकतात” असेच सांगितले. आणि झाले पण तसेच. महिन्याभरातच तो शाळेत व्यवस्थितपणे इंग्लिशमधून काय हवं नको ते सांगू शकत होता. मला कधीच त्याला मुद्दामून शाळेव्यतिरिक्त इंग्लिशचे धडे द्यावे लागले नाहीत. आणि घरी मात्र मी त्याच्याशी, आणि तो माझ्याशी व त्याच्या बाबांशी पाहिल्यापासून मराठी मधेच बोलत असल्यामुळे, त्याची ही सवय कायम रहिली. आणि मग त्या नंतरच्या दोन मुलांच्या वेळी मात्र ‘त्यांना इंग्लिश जमेल की नाही’, अशी शंका सुद्धा माझ्या मनात आली नाही. आता माझा सर्वात मोठा मुलगा १४ वर्षांचा असून तो व्यवस्थित मराठीत बोलतो. आणि तसेच दुसरे दोघेही. त्यांचा रोजचा गृहपाठ, इतर शाळेनंतरचे वर्ग, वगैरेतून मुद्दाम वेळ काढून, मराठी बोलण्याबरोबरच त्यांना मी मराठी लिहायला आणि वाचायलाही शिकवते आणि ह्या पुढेही शिकवत राहणार आहे. कारण भाषा लवकर आणि चांगली शिकण्यासाठी लिहिणे, वाचणे आणि बोलणे हे तिन्ही आवश्यक आहे. सरावही हवाच, जो सर्वात चांगला घरचीच मंडळी देउ शकतात.

हा लेख लिहिण्यामागचा माझा एकमात्र हेतू मराठी भाषा व संस्कृती टिकून राहावी एवढाच आहे. इतर भाषा/संस्कृती आत्मसात करायचा किंव्हा जाणून घ्यायचा  प्रयत्न करूच नये, असा मुळीच नाही. उलट जगातल्या सर्व संस्कृती/भाषा जाणून, समजून घ्यायची उत्सुकता असावी व त्यासाठी प्रयत्नही नेहमीच करावेत, पण आधी आपल्या संस्कृतीची/भाषेची जाण असणे आवश्यक आहे. त्याबद्दलही अभिमानाने दुसऱ्यांना सांगता यावे.

कालांतराने आपल्या मुलांना जेंव्हा मराठी भाषा त्यांच्या पुढच्या पिढ्यांमध्ये शिकवली व टिकवली जावी असे वाटेल, आणि त्याचा ते मनापासून प्रयत्न करतील, तेंव्हा त्यांची मराठी भाषेची शिकवण पूर्ण झाली, असे मी समजेन.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा