मसाला डोसा :
(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)
डोस्यासाठी :
१. ३ वाट्या तांदूळ, १/२ वाटी पोहे, ६ वाट्या पाण्यात भिजत टाकावेत. तसेच १ वाटी उडदाची डाळ व १ टेबलस्पून मेथी दाणे २ वाट्या पाण्यात भिजत टाकावेत. दोन्ही ७-८ तास भिजत ठेवावे.
२. तांदूळ व डाळ भिजल्यावर मिक्सर मध्ये वेगवेगळे बारीक वाटावेत.
३. आता दोन्ही मिसळावे व एका उंच पातेल्यात आंबण्यासाठी ८-९ तास उबदार ठिकाणी झाकून ठेवावे. पातेल्यात पीठ फुगून वर येण्यासाठी भरपूर जागा ठेवावी.
४. आंबलेले पीठ फसफसून वर येईल. ते सर्व मिसळावे व थोडे पाणी घालून तव्यावर पसरता येईल इतपत पातळ करावे. चवीप्रमाणे मीठ घालावे.
मसाल्यासाठी :
१. मध्यम आकाराचे ४ बटाटे घेऊन सोलून घ्यावेत व हातानेच त्यांचे छोटे छोटे तुकडे करावेत. पूर्ण कुस्करु नयेत.
२. एका कढईत ४ टीस्पून तेल घ्यावे व गरम करून त्यात १/२ टीस्पून मोहरी घालावी.
३. मोहरी तडतडल्यावर त्यात चिमूटभर हिंग, १/२ टीस्पून हळद, ३-४ कढिलिंबाची पाने, व एक छोटा कांदा बारीक चिरून घालावा. कांदा पारदर्शक होईपर्यंत परतावे.
४. आता बटाटे घालून सर्व मिसळावे. गॅस बारीक करावा व चवीप्रमाणे मीठ घालावे. सर्व मिसळून २ मिनिटांनी गॅस बंद करावा.
कृती :
१. गरम तव्यावर अंदाजे २ टेबलस्पून पीठ तव्याच्या मधोमध घालावे व एका पळीने गोलगोल बाहेरच्या बाजूस पसरून पातळ व गोल डोसा पसरावा.
२. डोस्यावर कडेला व मधे १/२ टीस्पून तेल पसरावे.
३. थोडी मोळगापोडी डोस्यावर पसरावी.
४. डोस्याची खालची बाजू गुलाबी होईपर्यंत शिजू द्यावे.
५. डोस्याच्या मध्ये २ टेबलस्पून बटाट्याचा मसाला घालून डोसा दोन्ही बाजूंनी दुमडावा.
६. गरम डोसा नारळाची चटणी व सांभार बरोबर वाढावा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा