मंगळवार, १९ मे, २०१५

करंजी / Karanji / Gujiya

करंजी :


(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)

कवाचासाठी :

१. १/२ वाटी रवा थोड्या दुधात भिजत ठेवावा. दूध अगदी थोडे, फक्त रवा पूर्ण ओलसर होईल एवढेच घालावे. 

२. त्यात १/२ वाटी मैदा, २ & १/२ टेबलस्पून गरम तेल, व चिमूटभर मीठ घालावे व दुधात, पुरीच्या पिठाप्रमाणे घट्ट भिजवावे. ही कणीक १५ मिनिटे मुरू द्यावी. 

सारणासाठी :

१. एका पातेल्यात १ & १/२ वाटी ताजे खोवलेले खोबरे घ्यावे व त्यात १ वाटी साखर मिसळावी. 

२. बारीक आचेवर सतत हलवत, वरील मिश्रण शिजवावे. प्रथम साखर विरघळेल, व विरघळलेल्या साखरेत खोबरे शिजेल. खोबऱ्याचा किंचित रंग बदलेपर्यंत व साखरेचा पातळपणा किंचित कमी होईपर्यंत शिजवावे. सारण कोरडे हवे असल्यास, आणखीन थोडे, साखर कडेने कोरडी होईपर्यंत, शिजवावे. 

३. सारणात १ टीस्पून तांदुळाची पिठी, आवडीप्रमाणे वेलदोड्याची पूड, व थोडे बेदाणे घालावेत. सर्व मिसळून गॅस बंद करावा. 

४. सारण पूर्ण गार होईपर्यंत वाट बघावी. 

कृती :

१. कणकेचे १/२-१" मोठे भाग करून घ्यावेत. 

२. प्रत्येक भाग हातामध्ये दाबून गोल करावा व हाताने दाबून चपटा करावा. 

३. एकावेळी एक गोळा घेउन अगदी पातळ गोलाकार लाटावा. त्याच्या मधोमध अंदाजे १ & १/२ टेबलस्पून सारण ठेऊन एका बाजूने अर्धगोलाकार दुमडावे. व बोटांनी दाबून कड घट्ट बंद करावी. असे सर्व कणकेच्या भागांबरोबर करावे. 

४. करंजीची कड कातण्याने कापावी किंव्हा वर दाखविल्याप्रमाणे मुरड घालावी. 

५. आता सर्व करंज्या मध्यम आचेवर हलक्या गुलाबी रंगावर तळून काढाव्यात. 
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा