शुक्रवार, २९ मे, २०१५

कढिलिंबाची चटणी / Kadhilimbachi chatni / Curry Leaves Chutney

कढिलिंबाची चटणी :


(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)

१. २ वाट्या कढिलिंबाची पाने मायक्रोवेव मधे १-२ मिनिटे गरम करून घ्यावीत. पूर्ण गार झाल्यावर पाने कुरकुरीत व्हायला हवीत. 

२. १/२ वाटी तीळ गुलाबी रंगाचे होईपर्यंत भाजून घ्यावेत. 

३. भाजलेले तीळ, कढिलिंबाची पाने, १/२ वाटी डाळं, १& १/२ टीस्पून आमचूर, १ टीस्पून साखरचवीप्रमाणे मीठ व तिखट, हे सर्व एकत्र करावे व मिक्सर मधे भरड वाटावे. 

४. ही पौष्टिक कढिलिंबाची चटणी कोरडीच किंव्हा थोड्या तेलाबरोबर जेवणात वाढावी. 

कणकेचा शिरा / kankecha shira / Wheat Flour Halwa

कणकेचा शिरा :


(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)

१. एका कढईत ४ & १/२ टेबलस्पून तूप घ्यावे व त्यात १ वाटी कणीक तपकिरी रंगाची होईपर्यंत भाजून घ्यावी. 

२. त्यात २ वाट्या गरम पाणी घालावे व सर्व चांगले मिसळून, झाकण ठेऊन मंद आचेवर एखादा मिनिट शिजू द्यावे. 

३. मग त्यात १ वाटी साखर घालावी व परत सर्व मिसळावे. झाकण ठेऊन २-३ मिनिटे शिजू द्यावे. 

४. वरून आवडत असल्यास बदामाचे काप घालावेत व गरम शिरा खायला द्यावा. 

गुरुवार, २८ मे, २०१५

भडंग / Bhadang

भडंग :


(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)

१. ४ वाट्या कोल्हापुरी चुरमुरे एका कढईत किंव्हा मायक्रोवेव मधे १-२ मिनिटे गरम करून कुरकुरीत करून घ्यावेत. 

२. एका वाटीत ३ टेबलस्पून तेल घेऊन त्यात १ टीस्पून धन्याची पूड, १ टीस्पून जिऱ्याची पूड, १ टीस्पून मेतकूट (पर्यायी), २ टीस्पून साखर, १ टीस्पून तिखट, व चवीप्रमाणे मीठ घालून सर्व एकत्र मिसळावे. 

३. हे तेल व मसाल्यांचे मिश्रण चुरामुऱ्यावर घालावे व चांगले मिसळावे. 

४. एका कढईत १ टेबलस्पून तेल गरम करून त्यात १ & १/२ टेबलस्पून मोहरी, १/४ टीस्पून हिंग, व १/२ टीस्पून हळद, व १०-१२ कढिलिंबाची पाने बारीक चिरून घालावीत. 

५. १/२ वाटी शेंगदाणे घालून ते गडद रंगाचे होईपर्यंत परतावेत व गॅस बंद करावा. 

६. वरील फोडणी कोमट झाल्यावर चुरामुऱ्यावर घालावी व सर्व मिसळावे. 

७. पूर्ण गार झाल्यावर भडंग हवाबंद डब्यात भरून ठेवावेत. 

उपमा / उप्पीठ / Upma

उपमा / उप्पीठ :

(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)

१. एका कढईत १ टीस्पून तेल गरम करावे व त्यात १ वाटी रवा गुलाबी रंगाचा होईपर्यंत भाजावा व एका बशीत काढून ठेवावा. 

२. त्याच कढईत ३ टेबलस्पून तेल गरम करावे व त्यात १ टीस्पून मोहरी घालावी. मोहरी तडतडल्यावर त्यात १ टीस्पून जिरे, १/४ टीस्पून हिंग, १ टीस्पून किसलेले आलं, ५-६ कढीलिंबाची पाने, २ उभ्या चिरलेल्या हिरव्या मिर्च्या, २ वाळलेल्या लाल मिर्च्या, व १ & १/२ टीस्पून उडदाची डाळ घालावी. आवडत असल्यास १/४ वाटी शेंगदाणे (पर्यायी) घालावे. 

३. डाळ गुलाबी रंगाची होईपर्यंत सर्व परतावे व मग १ बारीक चिरलेला कांदा घालावा. 

४. कांदा थोडा परतून त्यात २ & १/२ वाट्या पाणी घालावे. पाण्यात चवीप्रमाणे मीठ, १ & १/२ टीस्पून लिंबाचा रस, व १ टीस्पून साखर घालावी. 

५. व्हेजिटेबल उपम्यासाठी, पाण्यातच आपल्या आवडीच्या भाज्या (पर्यायी), जसे गाजराचे काप, मटारचे दाणे, किंव्हा फ्लॉवर ची फुले, मायक्रोवेव किंव्हा गरम पाण्यात थोड्या वाफवून घालाव्यात. पाण्याला उकळी येऊ द्यावी व गॅस बारीक करावा. 

६. आता त्यात भाजलेला रवा घालून सर्व चांगले मिसळावे व झाकण ठेऊन ४-५ मिनिटे शिजू द्यावे. मधे एकदा हलवायला विसरू नये. 

७. गॅस बंद करावा व वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरम उपमा खायला द्यावा. 

मंगळवार, १९ मे, २०१५

करंजी / Karanji / Gujiya

करंजी :


(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)

कवाचासाठी :

१. १/२ वाटी रवा थोड्या दुधात भिजत ठेवावा. दूध अगदी थोडे, फक्त रवा पूर्ण ओलसर होईल एवढेच घालावे. 

२. त्यात १/२ वाटी मैदा, २ & १/२ टेबलस्पून गरम तेल, व चिमूटभर मीठ घालावे व दुधात, पुरीच्या पिठाप्रमाणे घट्ट भिजवावे. ही कणीक १५ मिनिटे मुरू द्यावी. 

सारणासाठी :

१. एका पातेल्यात १ & १/२ वाटी ताजे खोवलेले खोबरे घ्यावे व त्यात १ वाटी साखर मिसळावी. 

२. बारीक आचेवर सतत हलवत, वरील मिश्रण शिजवावे. प्रथम साखर विरघळेल, व विरघळलेल्या साखरेत खोबरे शिजेल. खोबऱ्याचा किंचित रंग बदलेपर्यंत व साखरेचा पातळपणा किंचित कमी होईपर्यंत शिजवावे. सारण कोरडे हवे असल्यास, आणखीन थोडे, साखर कडेने कोरडी होईपर्यंत, शिजवावे. 

३. सारणात १ टीस्पून तांदुळाची पिठी, आवडीप्रमाणे वेलदोड्याची पूड, व थोडे बेदाणे घालावेत. सर्व मिसळून गॅस बंद करावा. 

४. सारण पूर्ण गार होईपर्यंत वाट बघावी. 

कृती :

१. कणकेचे १/२-१" मोठे भाग करून घ्यावेत. 

२. प्रत्येक भाग हातामध्ये दाबून गोल करावा व हाताने दाबून चपटा करावा. 

३. एकावेळी एक गोळा घेउन अगदी पातळ गोलाकार लाटावा. त्याच्या मधोमध अंदाजे १ & १/२ टेबलस्पून सारण ठेऊन एका बाजूने अर्धगोलाकार दुमडावे. व बोटांनी दाबून कड घट्ट बंद करावी. असे सर्व कणकेच्या भागांबरोबर करावे. 

४. करंजीची कड कातण्याने कापावी किंव्हा वर दाखविल्याप्रमाणे मुरड घालावी. 

५. आता सर्व करंज्या मध्यम आचेवर हलक्या गुलाबी रंगावर तळून काढाव्यात. 
झटपट रवा डोसा / Instant Rava Dosa

झटपट रवा डोसा :(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)

१. १ वाटी रवा, १ वाटी तांदुळाची पिठी, व १/४ वाटी मैदा, सर्व एकत्र मिसळून घ्यावे. 

२. त्यात २ टीस्पून जिरे, १/४ टीस्पून मिऱ्याची पूड, १ टेबलस्पून किसलेले आलं, चवीप्रमाणे मीठ, व आवडीप्रमाणे हिरव्या मिर्च्यांचे बारीक तुकडे घालावेत. 

३. हळू हळू पाणी घालत व हाताने सर्व मिसळत, ताकाप्रमाणे पातळ पीठ तयार करावे. 

४. १ कांदा बारीक चिरून घ्यावा. 

५. तवा गरम करून मध्यम आचेवर ठेवावा. त्यावर आधी १/४ टीस्पून तेल व मग बारीक चिरलेला कांदा पसरावा. 

६. वर तयार केलेले पीठ, चमच्याने पुन्हा एकसारखे करून, गरम तव्यावर एकसारखे पातळ पसरून घालावे. कडेने व डोस्याच्या मधे १/२ टीस्पून तेल पसरावे व डोसा खालून तपकिरी रंगाचा होईपर्यंत शिजू द्यावा व मग उलतन्याने दुमडून बशीत काढावा. 

७. गरम व कुरकुरीत रवा डोस्याबरोबर सांभारकोथिंबिरीची चटणी, किंव्हा नारळाची चटणी वाढावी. वाटल्यास बरोबर थोडा मसाला डोस्याचा मसाला ही वाढावा. 

सोमवार, १८ मे, २०१५

चपट्या शेंगांची भाजी / Stir fry flat beans

चपट्या शेंगांची भाजी :

(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)

१. २ वाट्या चपट्या शेंगा शिरा काढून निवडून घ्याव्यात. 

२. पाण्याने स्वच्छ धुऊन बारीक चिरून घ्याव्यात. 


३. दोन चिमूट बायकार्बोनेट सोडा चिरलेल्या भाजीवर पसरावा व हाताने सर्व मिसळावे. ह्यामुळे भाजीचा हिरवा रंग शिजल्या नंतरही छान राहतो.

४. १ टेबलस्पून मुगाची डाळ थोड्या पाण्यात २० मिनिटे भिजत घालावी. 


५.  एका कढईत ४ टीस्पून तेल गरम करावे व त्यात १/२ टीस्पून मोहरी घालावी. मोहरी तडतडल्यावर त्यात चिमूटभर हिंग, व १/२ टीस्पून हळद घालावी. 

६. वर भिजविलेली मुगाची डाळ, व चिरलेल्या शेंगा घालून सर्व मिसळावे. 


७. चवीप्रमाणे मीठ, १/२ टीस्पून साखर, व ३ हिरव्या मिर्च्या बारीक चिरून घालाव्यात. 

८. झाकण ठेऊन मंद आचेवर शेंगा ९०% शिजू द्याव्यात. मधे मधे हलवायला विसरू नये. 

९. आता त्यावर १/२ टीस्पून धन्याची पूड, व १/२ टीस्पून जिऱ्याची पूड घालावी व झाकण ठेऊन शेंगा  पूर्ण शिजू द्याव्यात.

१०. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी व ही चपट्या शेंगांची भाजी पोळीबरोबर वाढावी. 
रविवार, १७ मे, २०१५

घेवड्याची भाजी / Ghewdyachi bhaji / Stir Fry Valor Beans

घेवड्याची भाजी :
(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)

१. २ वाट्या घेवड्याच्या शेंगा शिरा काढून निवडून घ्याव्यात. 

२. स्वच्छ धूऊन बारीक चिराव्यात. 

३. एका कढईत २ टीस्पून तेल गरम करावे व त्यात १/२ टीस्पून मोहरी घालावी. मोहरी तडतडल्यावर त्यात चिमूटभर हिंग, व १/२ टीस्पून हळद घालावी. 

४. त्यावर चिरलेल्या शेंगा घालून सर्व मिसळावे. चवीप्रमाणे मीठ, १/२ टीस्पून धन्याची पूड, १/२ टीस्पून जिऱ्याची पूड, व १/२ टीस्पून साखर घालावी व सर्व मिसळावे. 

५. झाकण ठेऊन मंद आचेवर शेंगा पूर्ण शिजू द्याव्यात व मग गॅस बंद करावा. मधे मधे हलवायला विसरू नये. 

६. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी व घेवड्याची भाजी, पोळी किंव्हा फुलाक्याबरोबर वाढावी. 


गुरुवार, १४ मे, २०१५

गाजर टोमॅटो कोशिंबीर / Gajar tomato koshimbir / Carrot tomato salad

गाजर टोमॅटो कोशिंबीर :


(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)

१. ३ गाजरं बारीक किसून घ्यावीत. 

२. त्यात २ टेबलस्पून दाण्याचे कूटचवीप्रमाणे मीठ, १/२ टीस्पून साखर, व १/२ टीस्पून लिंबाचा रस घालून सर्व मिसळावे. 

३. एका छोट्या कढईत १ & १/२ टीस्पून तेल गरम करावे व त्यात १/२ टीस्पून जिरे, चिमूटभर हिंग, व २ हिरव्या मिर्च्या उभ्या चिरून घालाव्यात. दोन मिनिटे परतून गॅस बंद करावा. 

४. वरील फोडणी गाजारांवर घालावी व सर्व मिसळावे. 

५. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून, ही झटपट व पौष्टिक कोशिंबीर पोळीबरोबर वाढावी. 


अमसुलाचे / कोकमचे सरबत / Amsulache sarbat / Kokum sarbat

अमसुलाचे / कोकमचे सरबत :


(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)

१. ३ टेबलस्पून म्हणजे अंदाजे ८-१० अमसुले १/२ वाटी गरम पाण्यात २० मिनिटे भिजत ठेवावीत. 


२. मग मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यावीत. 


३. त्यात १ वाटी पाणी घालून सगळे मिसळावे व गाळण्याने गाळून, चोथा वगळून, रस बाजूला काढून घ्यावा. 

 

४. रसामधे १/४ वाटी साखर घालून, साखर विरघळेपर्यंत ढवळावे. हे मिश्रण अगोदर तयार करून ठेवावे. 


५. ऐनवेळी वरील ३/४ वाटी मिश्रणात १/२ वाटी पाणी, व चवीप्रमाणे मीठ (बाजारात मिळत असलेल्या अमसुलांना आधी पासूनच मीठ लावलेले असते हे लक्षात ठेवावे) घालावे. 

५. वरून १/४ टीस्पून जिऱ्याची पूड घालावी व हे सरबत थंड गार करून प्यायला द्यावे. मंगळवार, १२ मे, २०१५

तोंडल्याची भाजी / Tondlyachi bhaji / Stir Fry Kundru

तोंडल्याची भाजी :


(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)

१. तोंडल्यांचे गोलाकार व पातळ काप करून घ्यावेत. खालील प्रमाण साधारण २ वाट्या तोंडल्यांच्या चकत्यांसाठी आहे. 


२. एका कढईत ३ टीस्पून तेल गरम करून त्यात १/२ टीस्पून मोहरी घालावी. 

३. मोहरी तडतडल्यावर त्यात एक चिमूट हिंग, व १/४ टीस्पून हळद घालावी. 

४. त्यात तोंडल्यांच्या चकत्या घालाव्यात व सर्व दोन मिनिटे परतावे

५. चवीप्रमाणे मीठ, तिखट, २ टीस्पून काळा /गोडा मसाला, व १/२ टीस्पून साखर घालून सर्व मिसळावे व झाकण ठेऊन शिजू द्यावे. 

५. तोंडली मऊसर शिजल्यावर गॅस बंद करावा. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी व ही भाजी पोळीबरोबर वाढावी. 


भरली तोंडली / Bharli Tondli / Stuffed Kundru

भरली तोंडली :


(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)

१. अंदाजे १०-१२ तोंडली स्वच्छ धुऊन घ्यावीत व खाली दाखविल्याप्रमाणे प्रत्येक तोंडल्याला दोन चिरा पाडून घ्याव्यात. २. १/४ -१/२ वाटी दाण्याचे कूट घेऊन त्यात चवीप्रमाणे मीठ, १ टीस्पून तिखट, ३ टीस्पून काळा/ गोडा मसाला, व १ टीस्पून किसलेला गूळ घालावा. सर्व मिसळून मसाला तयार करून घ्यावा.  


३. एका वेळी एक तोंडले घेऊन त्याच्या चिरांमध्ये मावेल इतका मसाला भरावा. अश्याप्रकारे सर्व तोंडली मसाल्याने भरून घ्यावीत. 

३. एका कढईत ४ टीस्पून तेल घालून त्यात १/४ टीस्पून मोहरी घालावी. ती तडतडल्यावर त्यात चिमूटभर हिंग, व १/४ टीस्पून हळद घालावी. 

४. त्यात भरलेली तोंडली घालून थोडे परतावे व त्यात १/२ वाटी पाणी घालून व झाकण ठेऊन मंद आचेवर शिजू द्यावे. मधे मधे हलक्या हाताने हलवायला विसरू नये. ५. तोंडली मऊसर शिजल्यावर त्यात उरलेला मसाला व वाटल्यास आणखीन थोडे पाणी घालावे. 


६. २ मिनिटे आणखीन शिजू द्यावे व गॅस बंद करावा.

७. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी व भरली तोंडली पोळीबरोबर गरम गरम वाढावीत. कोथिंबिरीची चटणी / Kothimbirichi chutney / Coriander Chutney

कोथिंबिरीची चटणी :


(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)

१. १ वाटी स्वच्छ धुतलेली कोथिंबीर घ्यावी व त्यात १ टेबलस्पून लिंबाचा रस, १ मोठी लसणाची पाकळी, चवीप्रमाणे मीठ, व १ टेबलस्पून शेव किंव्हा बटाट्याचे वेफर्स घालावेत. 

२. सर्व मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यावे. ही कोथिंबिरीची चटणी कुठल्याही वड्याबरोबर किंव्हा डोसा, धिरडी, भेळ, इत्यादि पदार्थांबरोबर खूपच चविष्ट लागते. 

डाळ वडा / Dal Vada

डाळ वडा :


(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)

१. १ वाटी हरभऱ्याची डाळ ३-४ तास पाण्यात भिजत घालावी. भिजल्यानंतर पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावी. ह्यामुळे डाळीचा उग्र वास जाईल. 


२. भिजलेली डाळ, ३ मिर्च्या, २" मोठा आल्याचा तुकडा, ७-८ लसणाच्या पाकळ्या, व चवीप्रमाणे मीठ, सर्व मिक्सर मध्ये भरड वाटून घ्यावे. वाटताना कमीतकमी पाणी घालावे. 


३. त्यात १ बारीक चिरलेला कांदा, व १/२ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. 

४. एका कढईत तेल गरम करावे. हाताने किंव्हा चमच्याने पिठाचे छोटे छोटे गोळे तेलात टाकून ते गरम तेलामधे गुलाबी रंगावर तळून काढावेत. 

 

 
४. तळलेले वडे एका पेपर टॉवेल वर काढावेत व कोथिंबिरीच्या चटणी बरोबर गरम गरम खायला द्यावेत. सोमवार, ११ मे, २०१५

पाव भाजी / Pav bhaji

पाव भाजी :


(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)

१. एक फ्लॉवर , एक डब्बू मिर्ची, व ५ मध्यम आकाराचे बटाटे सालं काढून घ्यावेत. प्रत्येकाचे एक एक वाटी मोठे चौकोनी तुकडे करून घ्यावेत. २. वरील भाज्यांमध्ये १ वाटी मटारचे दाणे घालावेत व सर्व एका कुकर च्या भांड्यात घालून कुकर मध्ये एक शिट्टी यॆईपर्यन्त शिजवून घ्यावे. एक शिट्टी झाल्यावर गॅस बारीक करावा व ५ मिनिटांनी बंद करावा. (वरील भाज्यांमधे आपल्या आवडीनुसार इतर भाज्याही जसे पत्ता कोबी, व फरसबी च्या शेंगा ही एक एक वाटी घालायला हरकत नाही)

३. कुकर गार झाल्यावर शिजलेल्या भाज्या बाहेर काढून पळीने किंव्हा रवीने कुस्करून बाजूला ठेवाव्यात. 

४. एका मिक्सर मध्ये २" मोठा आल्याचा तुकडा, ५-६ मोठ्या लसणाच्या पाकळ्या, १ छोटा कांदा, व १ टोमॅटो, सर्व एकत्र बारीक वाटून ग्रेवी तयार करावी. 


५. एका कढईत २ & १/२ टेबलस्पून लोणी किंव्हा तेल गरम करून त्यात वरील तयार केलेली ग्रेवी व ३ टीस्पून पाव भाजी मसाला घालावा. ही ग्रेवी तपकिरी रंग यॆईपर्यन्त परतावी.  ६. त्यात वरील कुस्करलेल्या भाज्या, चवीप्रमाणे मीठ, व अंदाजे १ वाटी पाणी घालावे. बारीक गॅस करून उकळू द्यावे. मग गॅस बंद करावा. 


७. प्रत्येक पावाचे आडवे अर्धे काप करून आतील दोन्ही बाजूंस लोणी लावावे व तव्यावर भाजावेत. 

८. वाढताना एका ताठलीत गरम पावाबरोबर गरम भाजी घालावी. भाजीवर चवीप्रमाणे थोडे तिखट, थोडे लोणी, बारीक चिरलेला कांदा, व बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी व बरोबर एक लिंबाची फोड द्यावी. 

 

शेवयाची खीर / Shewayachi kheer

शेवयाची खीर :


(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)

१. १ वाटी शेवया बारीक चुरडून घ्याव्यात. 


२. ७-८ बदाम थोड्या गरम पाण्यात अंदाजे २० मिनिटांसाठी भिजत घालावेत व सालं काढून उभे व पातळ कापून घ्यावेत. 

३. एका पातेल्यात १ & १/२ टेबलस्पून तूप गरम करावे व त्यात शेवया घालून तांबूस रंगावर परताव्यात. 


४. त्यात १ लिटर दूध घालून हलवावे व मध्यम आचेवर सारखे ढवळत, उकळी आणावी. 


५. गॅस बारीक करावा व त्यात १ वाटी साखर, चवीप्रमाणे वेलदोड्याची पूड, व १/४ टीस्पून केशर बारीक चुरडून घालावे व परत २-३ मिनिटे सतत हलवत उकळू द्यावे. 


६. गॅस बंद करून वरून थोडे बेदाणे, व बदामाचे काप किंव्हा चारोळ्या घाव्यात. 

७. ही खीर गरम गरम असताना पुऱ्यांबरोबर खावयास द्यावी किंव्हा फ्रीज मध्ये थंड गार करून जेवणानंतर खायला द्यावी. दोन्ही पद्धतीने चविष्ट लागते.