बुधवार, १० जून, २०१५

शेंगदाण्याची चटणी / Shengdanyachi chutney / Dry peanut chutney

शेंगदाण्याची चटणी :


(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)

१. एका कढईत २ वाट्या शेंगदाणे मंद आचेवर भाजून घ्यावेत. शेंगदाण्याच्या सालांवर छोटे काळपट डाग पडेपर्यंत भाजावे. 

२. पूर्ण गार झाल्यावर हाताने चुरडून त्यांची सालं काढून घ्यावीत. 

३. एका सुपात किंव्हा ताठलीत घेऊन दाणे पाखडावेत व सालं फुंकून टाकावीत. 

४. मिक्सर मधे ४ टीस्पून जिरे, २-३ टीस्पून तिखट, २ टीस्पून साखरचवीप्रमाणे मीठ व आवडत असल्यास लसणाच्या ४-५ मोठ्या पाकळ्या एकत्र बारीक वाटून घ्याव्यात. त्यात १/२ वाटी वर भाजलेले शेंगदाणे घालावेत व परत सर्व बारीक वाटावे. बारीक वाटल्यावर शेंगदाण्याला किंचित तेल सुटेल. 

५. आता वरील पेस्ट/पावडर, १-२ टीस्पून तेल, व उरलेले शेंगदाणे फूड प्रोसेसर किंव्हा मिक्सर मधे भरड वाटावेत. 

६. सर्व एका भांड्यात काढून हाताने चांगले मिसळून घ्यावे व तयार शेंगदाण्याची चटणी डब्यात भरून ठेवावी.
७. ही चटणी जेवणात पोळी किंव्हा भाकरीबरोबर वाढावी. 

मंगळवार, ९ जून, २०१५

उपासाचा डोसा / Upasacha dosa / Vrat ka dosa

उपासाचा डोसा :


(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)

१. १ वाटी वऱ्याचे तांदूळ, १/२ वाटी साबूदाणा, व १/४ वाटी शेंगदाणे २-३ तास पाण्यात भिजत घालावेत. 

२. वर राहिलेले जास्तीचे पाणी बाजूला काढून ठेवावे. 

३. तांदूळ व साबुदाण्याच्या मिश्रणात २ टीस्पून जिरे, २ हिरव्या मिर्च्या, व चवीप्रमाणे मीठ घालून सर्व किंचित जाडसर वाटावे. वाटताना लागेल तसे बाजूला काढून ठेवलेले पाणी वापरावे. तयार पीठ साध्या डोस्याच्या पिठाप्रमाणे पातळ असायला हवे. 

४. गरम तव्यावर ३-४ टेबलस्पून तयार पीठ तव्याच्या मधोमध घालावे व पळीने पातळ व गोलसर पसरावे. कडेने व मध्ये १/२ टीस्पून तेल सोडावे. कडेने व खालील बाजू गुलाबी झाल्यावर उलतन्याने डोसा काढावा व गरम गरम खायला द्यावा. उपासाच्या डोस्याबरोबर उपासाचे गोड लोणचे किंव्हा दाण्याची चटणी आणि उपासाची बटाट्याची  भाजी वाढावी. 

हरभऱ्याची कोरडी उसळ / Harbharyachi usal / Dry kala chana

हरभऱ्याची कोरडी उसळ :


(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)

१. १ वाटी हरभरे ४-५ तास पाण्यात भिजत घालावेत. 

२. थोडे मीठ घालून कुकर मधे ३ शिट्या येईपर्यंत शिजवावेत. तीन शिट्ट्या झाल्यावर गॅस बारीक करावा व आणखीन २०-२५ मिनिटे शिजू द्यावेत. कुकर गार झाल्यावर हरभरे बाहेर काढावेत. 

३. शिजल्यावर वर राहिलेले पाणी बाजूला काढून ठेवावे. 

४. एका कढईत ३ टेबलस्पून तेल गरम करून त्यात १ टीस्पून जिरे, २ लाल मिर्च्या२ टीस्पून धन्याची पूड, २ टीस्पून जिऱ्याची पूड, चवीप्रमाणे मीठ (शिजविलेल्या हरभऱ्यातही मीठ आहे हे लक्षात ठेवावे) व लाल तिखट घालावे व मंद आचेवर थोडे परतावे. 

५. त्यात शिजलेले हरभरे घालून सगळे मिसळावे. बाजूला काढून ठेवलेले पाणी वापरून दोन ओंजळ पाणी हरभऱ्यावर शिंपडावे. २ मिनिटे परतून गॅस बंद करावा. 

६. हे हरभरे पुरी किंव्हा पोळीबरोबर छान लागतात. नवरात्रीतील अष्टमीच्या दिवशी हे हरभरे शिरा व पुरी बरोबर देतात. 

सोमवार, १ जून, २०१५

स्प्रिंग डोसा / Spring dosa

स्प्रिंग डोसा :



(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)

सारणासाठी :

१. २ बटाटे व १/२ कांदा वापरून मसाला डोस्याप्रमाणे मसाला तयार करून घ्यावा. 

२. २-३ टीस्पून तेल गरम करावे व त्यात १/४ वाटी किसलेले गाजर, १/४ वाटी बारीक चिरलेला पातीचा कांदा, १/४ वाटी भरड वाटलेला फ्लॉवर, व १/४ वाटी बारीक चिरलेली डब्बू मिर्ची घालावी. 

३. २ मिनिटे परतून त्यात चवीप्रमाणे मीठ, व १ टीस्पून संभार मसाला घालावा. सर्व मिसळावे. 

४. त्यात बटाटा व कांद्याचा मसाला मिसळावा व गॅस बंद करावा. 


डोस्यासाठी :

१. डोस्याचे पीठ तयार करून घ्यावे. 

२. तवा गरम करून मध्यम आचेवर ठेवावा. तव्याच्या मधोमध अंदाजे ३ टेबलस्पून डोस्याचे पीठ घालावे व पळीने पातळ व गोल पसरावे. 

३. कडेने व मध्ये १ टीस्पून तेल सोडावे व डोसा खालून गुलाबी व्ह्यायला लागल्यावर, मधे ३-४ टेबलस्पून मसाला घालावा व डोसा दोन्हीबाजूंनी दुमडावा. 

४. गरम गरम स्प्रिंग डोसा सांभार व चटणी बरोबर खायला द्यावा. 

पोहे / Pohe

पोहे :


(सर्व सामग्री रेखांकित केले आहे)

१. २ वाट्या मध्यम जाड पोहे एका रोळीत पाण्याने धुऊन घ्यावेत. व निथळायला १० मिनिटे ठेवावेत. 

२. १/४ वाटी मटारचे दाणे थोडे पाणी घालून मायक्रोवेव मधे शिजवावेत. फ्रोझन मटार वापरल्यास शिजवायची गरज नाही. 

३. एका कढईत २ टेबलस्पून तेल गरम करून घ्यावे व त्यात १ टीस्पून मोहरी घालावी. मोहरी तडतडल्यावर त्यात १/४ टीस्पून हिंग, १/२ टीस्पून हळद, २ हिरव्या मिर्च्या उभ्या चिरून, ५-६ कढिलिंबाची पाने, व एका बटाट्याच्या पातळ चकत्या घालाव्यात. 

४. बटाटे किंचित गुलाबी होईपर्यंत परतावे व मग झाकण ठेऊन बटाटे पूर्ण मऊ होईपर्यंत शिजवावे. 

५. आता १ कांदा बारीक चिरून घालावा व २ मिनिटे परतावा. 

६. त्यावर निथळलेले पोहे घालून चांगले मिसळावे. 

७. फ्रोझन किंव्हा शिजविलेले मटार घालून, १ & १/२ टीस्पून साखर, चवीप्रमाणे मीठ, व १ & १/२ टीस्पून लिंबाचा रस घालून सर्व हलवावे. 

८. २ मुठी पाणी सगळ्या पोह्यांवर शिंपडावे व गॅस बारीक करून, झाकण ठेवावे. ५ मिनिटे शिजू द्यावे व मधे मधे एक दोनदा हलवायला विसरू नये. 

९. गॅस बंद करावा व वरून बारीक चिरलेली कोथिंबीर किंव्हा बारीक शेव घालून गरम गरम पोहे खायला द्यावेत.