शुक्रवार, १० एप्रिल, २०१५

मिसळ-पाव / Misal Pav

मिसळ-पाव :


(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)

उसळीसाठी : १ मोठी वाटी मोड आलेली मटकी घ्यावी. त्यात २ वाट्या पाणी घालून प्रेशर कुकर मध्ये १ शिट्टी यॆईपर्यन्त शिजवावे. १ शिट्टी झाल्यावर गॅस बंद करावा व थंड झाल्यावर झाकण उघडून मटकी बाहेर काढावी. एका पातेल्यात ४ टीस्पून तेल गरम करून त्यात १ टीस्पून मोहरी घालावी. ती तडतडल्यावर त्यात चिमूटभर हिंग, व १ टीस्पून हळद घालावी. आता त्यावर शिजविलेली मटकी घालून सर्व मिसळावे. २ हिरव्या मिर्च्या व ४ लसणाच्या पाकळ्या ह्यांची बारीक पेस्ट करून घ्यावी व मटकीत  घालावी. चवीप्रमाणे मीठ२ टेबलस्पून काळा मसाला१ टेबलस्पून गूळ, व २ टीस्पून जिऱ्याची पूड घालावी. एक उकळी आल्यावर गॅस बंद करावा. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. अश्याप्रकारे मटकीची उसळ बनवावी. ही उसळ पोळी किंव्हा भाताबरोबर खावी. 

मिसळीसाठी : मटकीच्या उसळ खाली दिल्याप्रमाणे वाढल्यास त्याला मिसळ असे म्हणतात. मिसळ नुसतीच किंव्हा पावाबरोबर खावी. मिसळीसाठी, एका वाटीत सर्वात आधी २ टेबलस्पून गरम उसळ घालावी. त्यावर १ टेबलस्पून फरसाण/चिवडा घालावा. त्या नंतर १ & १/२ टीस्पून प्रत्येकी बारीक च्रालेला कांदा व बारीक चिरलेला टोमॅटो घालावा. त्याच्या वर १ & १/२ टीस्पून चिंचगुळाची गोड चटणी, व १ & १/२ टीस्पून कोथिंबरीची चटणी घालावी. त्यावर परत २ टेबलस्पून उसळ घालावी. सगळ्यात वर परत १ टेबलस्पून फरसाण घालावे व तयार मिसळ नुसती, किंव्हा गरम पावाबरोबर, खायला द्यावी. 



पावासाठी : प्रत्येक पाव मधून आडवा कापावा व त्याच्या दोन्ही आतल्या बाजूंस थोडे लोणी लाऊन गरम तव्यावर गुलाबी होईपर्यंत भाजावे. गरम गरम पाव, गरम गरम मिसळीबरोबर खायला द्यावेत. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा