माझे बाबा
सज्जन वृत्ती प्रामाणिकता
अद्भुत असे देशप्रेम
लिखाण वाचन अखण्ड चाले
तोचचि नित्य नेम
बालपणी जो हात धरुनि मज
लिहावयास शिकविले
त्या वडिलांवर काव्य कराया
आज मला की गमले
कुठे करू सुरवात कळेना
सांगू किती कुठपर्यंत
अवघे चित्रचि उभे ठाकले
आठवणी अनंत
भाषेपासुनी सुरवात करूया
त्यांना भाषा शिकण्याचा नाद
म्हणती की भाषेमुळेच
घडे परस्पर संवाद
संस्कृत, मराठी, इंग्रजी, हिंदी
भाषांवर त्यांचे प्रभुत्व
सुरेख अक्षर अस्खलित वाणी
शुद्ध लेखनाचे महत्व
स्वयंपाक असो की संमार्जन वा
उसवल्या वस्त्राची शिवण
अडचणी आल्या असंख्य तरीही
स्वावलंबनाची शिकवण
काम कुठलेही अचूक करावे
असे आम्हास शिकविले
त्या वडिलांवर काव्य कराया
आज मला की गमले
शिकवणींची ही अमूल्य रत्ने
आम्हास देउनि थकले
तरीहि म्हणती तुम्हास द्यायला
मजकडे काहीच न उरले
कष्ट करुनी प्राप्त धनही
आम्हास घडविण्या वापरले
त्या वडिलांवर काव्य कराया
आज मला की गमले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा