पिठले (कांद्याचे किंव्हा लसणाचे) (४ जणांसाठी):
(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)
एका पातेल्यात ४ टीस्पून तेल गरम करावे. त्यात १ टीस्पून मोहरी, १ टीस्पून जिरे, १/२ टीस्पून हिंग, व १ टीस्पून हळद घालून फोडणी करावी. १ बारीक चिरलेला कांदा* व ३ उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालाव्यात. कांदा गुलाबी रंगावर परतून झाल्यावर ४ वाट्या पाणी घालावे. चवीप्रमाणे मीठ घालावे व पाण्याला अधण येऊ द्यावे. आता एका हाताने चमच्याने ढवळत, दुसऱ्या हाताने थोडे थोडे पीठ पाण्यात घालावे. गाठी होउ देऊ नयेत. ४ वाट्या पाण्याला साधारण १ वाटी बेसन लागेल. पिठले घट्ट आवडत असल्यास जास्त बेसन लावावे व पातळ आवडत असल्यास कमी बेसन लावावे. आता गॅस बारीक करून २ मिनिटे शिजू द्यावे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. पोळी, भाकरी किंव्हा भाताबरोबर गरम गरम वाढावे.
* लसणाचे पिठले करायचे असल्यास, कांद्याच्या ऐवजी ४ लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून फोडणीत घालाव्यात व गुलाबी रंगावर परताव्यात. बाकी सर्व कृती वरील प्रमाणेच.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा