२ वाट्या हरभऱ्याची डाळ, दुप्पट पाणी घालून कुकर मध्ये ३ शिट्ट्या येईपर्यंत शिजवून घ्यावी. ३ शिट्ट्या झाल्यावर ५ मिनिटे गॅस बारीक करून मग बंद करावा. शिजलेल्या डाळीवरचे पाणी (म्हणजेच कट) वेगळे काढून ठेवावे व नंतर कटाची आमटी करायला वापरावे. शिजलेली डाळ मिक्सर मध्ये अगदी बारीक वाटून घ्यावी. वाटताना गरजेपुरते पाणी घालावे. वाटलेल्या डाळीत २ वाट्या गूळ घालावा व मंद गस वर हे पुरण शिजायला ठेवावे. गॅसच्या ऐवजी मायक्रोवेव मध्ये ही पुरण शिजविता येते. गॅस किंव्हा मायक्रोवेव मध्ये शिजविताना ५-५ मिनिटांनी सतत हलवावे, पातेल्याला खाली लागू देऊ नये. पुरण शिजून गार झाल्यावर त्याचा गोळा करता येईल, इतपत ते घट्ट व्हायला हवे. तोपर्यंत शिजवावे. पुरण गार झाल्यावर त्यात १/४ जायफळ किसून व आवडीप्रमाणे वेलदोड्याची पूड घालावी. सर्व चांगले मिसळावे.
कणकेसाठी:
१ वाटी कणीक, ४ टेबलस्पून मैदा, चिमूटभर मीठ, व १/४ वाटी तेल घालून कणीक चांगली मळावी. तेल व पाणी लाऊन कणीक खूप मळावी.कणकेला चिकटपणा येऊन तार यायला हवी. व कणीक पुरणाइतकीच घट्ट व्हायला हवी. भिजवलेली कणीक १/२ तास मुरू द्यावी.
कृती:
(वरील व्हिडिओ पहावा)
पोळपाटाला एक पातळ सुती कापड गुंडाळावे. ह्यामुळे पोळी लाटताना पोळपाटाला चिकटत नाही. गॅस वर तवा मध्यम आचेवर गरम होण्यास ठेवावा. कणकेचा अंदाजे १ &१/२" गोळा घ्यावा व त्याच्या दुप्पट पुरणाचा गोळा घ्यावा. वर चलचित्रात दाखविल्याप्रमाणे उंडे करून घ्यावेत. आता कापड गुंडाळलेल्या पोळपाटावर हलक्या हाताने तांदुळाची पिठी वापरून पातळ लाटावे व अलगद उचलून तव्यावर टाकावे. दोन्ही बाजूनी पोळी खमंग भाजावी व पातळ तूप त्यावर पसरून खावयास द्यावी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा