कटाची आमटी
(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)
पुरणाची डाळ शिजवल्या नंतर, डाळीवर जे पाणी राहाते, ते म्हणजे कट. पुरणाची डाळ वाटायच्या आधी कट वेगळा काढून घ्यावा. व त्यात ३ वाट्या पाणी घालावे. बऱ्याचदा डाळीवरचे पाणी डाळ शिजताना संपून जाते व कटासाठी पाणी उरत नाही. असे झाल्यास, १ टेबलस्पून तयार पुरण/ शिजलेली पुरणाची डाळ घेऊन, ३ वाट्या पाण्याबरोबर मिक्सर मधून फिरवावी व ती कट म्हणून वापरावी. छोट्या अर्ध्या लिंबा इतकी चिंच पाण्यात भिजत घालावी. १ टीस्पून जिरे व १ टेबलस्पून किसलेले कोरडे खोबरे गुलाबी रंगावर भाजून घ्यावे व बारीक वाटावे. १ टेबलस्पून तेल घेऊन त्यात १ टीस्पून मोहरी, १/२ टीस्पून हिंग व १ टीस्पून हळद घालून फोडणी करावी. त्यात १ तमालपत्र, १" दालचीनीचा तुकडा, व ४-५ कढिलिंबाची पाने घालावीत. आता तयार केलेला कट त्यात ओतावा. चवीप्रमाणे मीठ, तिखट घालावे. २ टीस्पून काळा/गोडा मसाला घालावा. त्यातच चिंचेचा कोळ घालावा (बाजारात मिळत असलेला तयार चिंचेचा कोळ घातल्यास, तो १/४ टीस्पून घालावा). चिंचेच्या दुप्पट गूळ (अंदाजे २ टेबलस्पून, व कटासाठी पुरण वापरले असल्यास, १ & १/२ टेबलस्पून) घालून आमटी चांगली उकळावी व गरम गरम वाढावी. ही आमटी नेहमी पुरणाच्या स्वयंपाकात असते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा