शुक्रवार, १० एप्रिल, २०१५

आलू टिक्की / Aloo Tikki

आलू टिक्की (२० टिक्क्यांसाठी) :



(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)

टिक्कीच्या सारणासाठी :

१. १/४ वाटी हरभऱ्याची डाळ १ वाटी पाण्यात ४-५ तास भिजत घालावी. 

२. सर्व पाणी काढून टाकावे व डाळ ग्राइंडर किंव्हा फूड प्रोसेसर मध्ये भरड वाटून घ्यावी. 

३. वाटलेली डाळ प्रेशर कुकर मधे  १५ मिनिटे एक शिट्टी येईपर्यंत शिजवावी. एक शिट्टी झाल्यावर गॅस बंद करावा व गार झाल्यावर डाळ बाहेर काढावी. 

४.  गार होण्यासाठी एका बशीत पसरून व गोळे मोडून ठेवावी. 

५. एका कढईत २ टेबलस्पून तेल गरम करावे व त्यात शिजविलेली डाळ घालावी. एकदा हलवून गॅस बारीक करावा. त्यात १/२ ते ३/४ टीस्पून गरम मसाला, १ टीस्पून आमचूर, १ टीस्पून तिखट व चवीप्रमाणे मीठ घालून सर्व मिसळावे. ५ मिनिटे किंव्हा ओलसरपणा जाईपर्यंत परतावे. मग गॅस बंद करावा व हे सारण बाजूला ठेवावे. 

टिक्कीच्या कावाचासाठी :

 


१. ८ बटाटे उकडून, सोलून व कुस्करून घ्यावेत. 

२. ३ ब्रेडच्या स्लाइसेस पैकी एक घ्यावी व एका वाटीत पाणी घेऊन त्यात बुडवावी. दोन्ही हातांमध्ये दाबून पिळून घ्यावी व बटाट्यात मिसळावी. असेच बाकी दोन्ही स्लाइसेसचेही करावे. चवीप्रमाणे मीठ घालून सर्व एकत्र कालवावे. 

३. सारणाचे २" गोळे करून घ्यावेत. एका गोळ्यात बोटानेच थोडा खोलगट भाग करावा व त्यात १ टीस्पून डाळीचे सारण भरावे. सगळ्या बाजूंनी वर आणावे व वरून बंद करावे. हाताने थोडे दाबून किंचित चपटे करावे. असेच सर्व गोळ्यांबरोबर करावे. 

टिक्की तळण्याची कृती :


१. एक मधोमध खोलगट असलेला तवा गरम करायला ठेवावा. तव्याच्या मध्यभागावर २ टेबलस्पून तेल घालावे. 

२. एका वेळी एक किंव्हा दोन टिक्क्या घेऊन, त्या तव्यावरच्या तेलावर दोन्ही बाजूंनी तळाव्यात. टिक्क्यांचा नवीन घाणा तव्यावर घालताना, तेल टिक्यांच्या कडा बुडतील इतके असावे. 

३. तळलेल्या टिक्क्या एका पेपर टॉवेल वर काढाव्यात. 

वाढण्यासाठी : गरम गरम टिक्क्या चिंच गुळाच्या चटणीबरोबर व कोथिंबिरीच्या चटणीबरोबर खायला द्याव्यात. किंव्हा टिक्क्यांचा आलू टिक्की चाट बनवून द्यावा. 

 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा