मुगाच्या डाळीची खिचडी :
१ वाटी तांदूळ व ३/४ वाटी मुगाची डाळ* स्वच्छ धुऊन घ्यावी. एका पातेल्यात १ टेबलस्पून तेल गरम करावे व १ टीस्पून जिरे, एक चिमूटभर हिंग, १ टीस्पून हळद, व ४-५ कढिलिंबाची पाने घालून फोडणी करावी. त्यात धुतलेले डाळ व तांदूळ घालून २ मिनिटे परतावे. त्यात ४ वाट्या पाणी (खिचडी थोडी कोरडी हवी असल्यास ३ वाट्या पाणी घालावे), चवीप्रमाणे मीठ व २ टीस्पून जिऱ्याची पूड घालावी. **पातेले कुकर मध्ये ठेऊन झाकण बंद करावे. १ शिट्टी झाल्यावर गॅस बारीक करावा व २ मिनिटांनी बंद करावा. प्रेशर गेल्यावर झाकण उघडावे व गरम गरम कढी, पापड व लोणच्याबरोबर खायला द्यावे.
*३/४ वाटी मुगाची साल असलेली डाळ किंव्हा १/३ वाटी साल काढलेली, व १/३ वाटी साल असलेली डाळ वापरली तरी चालेल.
**आवडत असल्यास १/४ वाटी छोटे तुकडे करून गाजर, मटर, फरसबीच्या शेंगा, इत्यादी भाज्या ही पाण्यात घालाव्यात व मग शिजवावे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा