सुरळीच्या वड्या ( ३०-३५ वड्यांसाठी)
(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)
एका पातेल्यात, दोन वाट्या पाणी घ्यावे. त्यात चवीप्रमाणे मीठ व पाऊण वाटी ताक, व एक वाटी डाळीचे पीठ (बेसन) घालावे. बेसनाच्या गुठळ्या मोडेपर्यंत सर्व एकत्र मिसळावे.
पातेले गॅस वर अगदी मंद विस्तवावर ठेऊन पीठ सतत हलवावे. साधारण ८-१० मिनिटांनी पीठ घट्ट व्हायला सुरवात होते.
एका चमच्यात पीठ घेउन ते ओतून बघावे. पीठ चमच्यालाच चिकटून लोंबकळायला हवे. तोपर्यंत सतत हलवत गॅस चालू ठेवावा.
आता चमच्याने थोडे थोडे पीठ घेउन, रिकाम्या ताठल्यांमध्ये डोस्याप्रमाणे पसरावे. डोस्यापेक्षा किंचित जाड थर ठेवावा. गरम असतानाच सगळे पीठ ताठल्यांमध्ये पसरून व्हायला हवे. आता ताठल्यांतील पसरलेले पीठ गार व्हायला तसेच ठेवावे.
एका कढईत २ टेबलस्पून तेल गरम करून त्यात ३ टीस्पून मोहरी व १/२ टीस्पून हिंग ह्याची फोडणी करावी व गार होण्यास ठेवावी. एका ताठलीत, १ वाटी ओले खोबरे व १/२ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर मिसळावी. त्यात चवीप्रमाणे मीठ व बारीक वाटलेली हिरवी मिरची घालावी. सर्व कालवावे.
गार झालेली फोडणी, गार झालेल्या पसरून ठेवलेल्या पिठावर थोडी थोडी पसरावी. त्यावरच खोबरे व कोथिंबीरीचे मिश्रण थोडे थोडे पसरावे. आता हलक्या हाताने, पसरलेल्या पिठाची कड उचलून, हळू हळू सुरळी करावी. सुरळीचे साधारण २" लांब काप करून खायला द्यावेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा