शुक्रवार, १० एप्रिल, २०१५

बटाटे वाडा / Batata Wada

बटाटे वाडा :




(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)

सारण : ५ मोठे बटाटे उकडून साल काढून घ्यावेत व हातानेच त्यांचे छोटे छोटे तुकडे करावेत(खाली चित्रात दाखविल्याप्रमाणे). पूर्ण कुस्करून टाकू नयेत. 

५" आल्याचा तुकडा५ मोठ्या लसणाच्या पाकळ्या५-६ हिरव्या मिर्च्या, सर्व एकत्र बारीक वाटून घ्यावे. एका कढईत २ टीस्पून तेल गरम करून त्यात १ टीस्पून मोहरी घालावी. मोहरी तडतडल्यानंतर त्यात १ टीस्पून जिरे१/४ टीस्पून हिंग१ टीस्पून हळद६-७ कढिलिंबाची पाने बारीक चिरूनव १ कांदा बारीक चिरून घालावा. वरून आलं-लसूण-मिर्चीची पेस्ट घालावी. सर्व १ मिनिट परतावे व गॅस बंद करावा. आता त्यावर हाताने कुस्करलेले बटाटे, व चवी प्रमाणे मीठ घालून सगळे चांगले मिसळावे. ह्या सारणाचे अंदाजे १" मोठे गोळे करून घ्यावेत. 

कवच : ३/४ वाटी बारीक दळलेले डाळीचे पीठ (बेसन)१ टेबलस्पून भरड दळलेले डाळीचे पीठ (ते नसल्यास १ टेबलस्पून तांदुळाची पिठी)चवीप्रमाणे मीठ व १ टेबलस्पून गरम तेल, हे सर्व एकत्र करावे. एका हाताने पाणी घालत घालत दुसऱ्या हाताने पिठाचे गोळे मोडत पीठ कालवावे. पुढील कृतीत, पीठ सारणाच्या भोवती व्यवस्थित बसेल, इतपत घट्ट असावे. 

कृती : एका कढईत तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवावे. कवचासाठी तयार केलेले पीठ तेलात टाकून बघावे. जर पीठ लगेच तरंगून वर आले तर योग्य तापमान आहे, पण जर लगेच वर येऊन गुलाबी झाले तर जास्त आहे. आता सारणाचा प्रत्येक गोळा घेऊन पिठात बुडवावा व मध्यम आचेवर तेलात तळून काढावा. चिंचगुळाच्या गोड चटणी बरोबर, किंव्हा शेंगदाण्याच्या कोरड्या चटणीत थोडे लिंबू पिळून त्याबरोबर, गरम गरम खायला द्यावे किंव्हा पावात घालून वडा-पाव खायला द्यावा. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा