पहिला हिमपात
हिवाळ्यातला पहिला हिमपात
थंडीची करितो खरी सुरवात
दृश्य जरी ते जुने ओळखीचे
आजही पाहुनी डोळे दिपतात
अलगद बर्फाचे थेंब थबकती
झाडांच्या उंच शिखारांवरती
आकाशातुनी भूवरी पडता
गवतावरती दमून निजती
दृश्य सारे बदलून जाते
सगळीकडेच श्वेत पसरते
वसुधा जणू थंडीत जपाया
कापसाची मऊसर शाल पांघरते
पायवाट व रस्त्यातील अंतर
होउनी जाई अगदीच धूसर
जपुनी चालती पथिक सारे
लक्ष पावलांकडे निरंतर
मुले आनंदुनी नाचती बागडती
हिमपऱ्यांची स्वप्ने बघती
जाऊ म्हणती राज्य कराया
सैन्य घेउनी हिमकिल्यांवरती
मोठ्यांना वाटे घरी बसावे
जागेवरुनी अजिबात न उठावे
ऊष्म पेय हातात घेउनी
शेकोटीसमोर मजेत बसावे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा