शुक्रवार, १० एप्रिल, २०१५

शरद ऋतू

शरद ऋतू



वसंत सरला, ग्रीष्म संपला
आता शरदाचे वैभव 
हिरव्या गार झाडांत अवचित 
लाल पिवळे पल्लव 

पशू व पक्षी करू लागले 
पूर्व तयारी गारठ्याची 
वृक्षवल्लीही वेश बदलती 
अद्भुत किमया निसर्गाची 

बघता बघता रंग बदलले 
छटा तयात अनेक 
पीत केशरी लाल जांभळी
नटली धरा सुरेख

दोन्ही बाजूंस रस्त्यास वेढले 
उंच रंगीत झाडांनी 
वाटेतही गालिचा पसरला 
पुष्परूपी पर्णांनी 

रंग सारे उजळून निघती 
सूर्याच्या लख्ख प्रकाशात 
मुग्ध होउनी सारे बघती 
जणू असू स्वर्गात 

दोन दिसांचा असे सोहळा 
घ्या डोळ्यात भरून 
चुकल्यास मात्र वाट पहावी 
एकच वर्ष अजून 


Photo (c) 2014 Rajesh Abhyankar 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा