शुक्रवार, १० एप्रिल, २०१५

भरली डब्बू मिर्ची / Bharli Dabbu Mirchi

भरली डब्बू मिर्ची :


(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)

१. दोन छोट्या आकाराच्या डब्बू मिर्च्या स्वच्छ धुऊन घ्याव्यात. आता प्रत्येक मिर्चीच्या देठाच्या कडेकडेने अश्या पद्धतीने कापावे ज्यामुळे वरील देठ झाकणाप्रमाणे उघडता येईल (वरील चित्र पहावे). आता सुरीने आतील बिया काढून टाकाव्यात. जर मिर्च्या खूपच मोठ्या असतील तर त्या मधून आडव्या कापून अर्ध्या कराव्यात. 

२. तीन मध्यम आकाराचे बटाटे उकडून सोलावेत व हाताने त्यांचे छोटे छोटे तुकडे (वर चित्रात दिल्याप्रमाणे) करून घ्यावेत. पूर्ण कुस्करू  नयेत. 

३. एका कढईत ३ टीस्पून तेल गरम करून घ्यावे व त्यात १/४ टीस्पून हिंग१ टीस्पून हळद१ & १/२ टीस्पून आल्याची पेस्ट१ & १/२ टीस्पून लसणाची पेस्ट१ & १/२ टीस्पून हिरव्या मिर्च्यांची पेस्ट, व एक बारीक चिरलेला छोटा कांदा, घालावा. सगळे मिसळावे. त्यात २ टीस्पून गरम मसाला, व २ टीस्पून आमचूर घालून, कांदा किंचित गुलाबी होईपर्यंत परतावे. त्यात वर कुस्करलेला बटाटा घालावा व चवीप्रमाणे मीठ घालून एखादा मिनिट परतावे व गॅस बंद करावा. हे सारण थोडे जास्त मसालेदार असायला हवे कारण बाहेरच्या मिर्चीला काहीच मसाला नसेल.  

४. आता प्रत्येक मिर्ची बटाटाच्या साराणाने वरपर्यंत भरावी व देठाच्या झाकणाने वरून बंद करावी. मोठ्या मिर्च्यांसाठी, प्रत्येक अर्धा भाग साराणाने वरपर्यंत भरून घ्यावा.  

५. एका पसरट भांड्यात/कढईत ४ टेबलस्पून तेल गरम करावे व त्यात भरलेल्या मिर्च्या  ठेवाव्यात. वर झाकण ठेऊन मध्यम आचेवर शिजू द्यावे. दर २-३ मिनिटानी मिर्च्या फिरवून ठेवाव्यात. मिर्च्या सगळ्या बाजूंनी शिजायला हव्यात. गॅस ऐवजी मिर्च्या मायक्रोवेव मधे शिजविल्या तरी चालतील. तसे केल्यास मिर्च्यांना बाहेरून थोडे तेल लाऊन मग झाकण असलेल्या मायक्रोवेव-सेफ भांड्यात शिजवावे. मला गॅसवर शिजवायला जास्त आवडते कारण त्यामुळे मिर्च्या जास्त खमंग लागतात. (कधी कधी मिर्च्यांची बाहेरची कड जाड असते व पटकन शिजत नाही. तसे असल्यास ५ मिनिटे मायक्रोवेव मधे शिजवून मग गॅसवर पूर्ण शिजवाव्यात. 

६. गरम गरम भरल्या मिर्च्या पोळीबरोबर वाढाव्यात. 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा