गाजराचे परोठे :
(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)
सारणासाठी : १ वाटी गाजरं स्वच्छ धुऊन, सालं काढून, व किसणीने किंव्हा फूड प्रोसेसर मधे किसून घ्यावीत. एका कढईत १ & १/२ टेबलस्पून तेल गरम करावे. त्यात १ टीस्पून मोहरी, १/२ टीस्पून हिंग, व १ टीस्पून हळद घालावी. त्यावर किसलेली गाजरं घालावीत व सर्व मिसळावे. चवीप्रमाणे मीठ व तिखट घालून चांगले हलवावे. झाकण ठेऊन १० मिनिटे शिजू द्यावे. मधे मधे एक दोनदा हलवावे. गाजरे थोडी मऊसर झाल्यावर त्यात २ टेबलस्पून डाळीचे पीठ (बेसन) घालावे. डाळीच्या पिठामुळे सारण एकत्र बांधायला मदत होते.
कवचासाठी कणीक : १ & १/२ वाटी गव्हाचे पीठ घेऊन त्यात १/२ टीस्पून मीठ, व २ टीस्पून तेल घालावे व पाण्याने पोळीच्या पिठाप्रमाणे मऊसर मळावे. १०-१५ मिनिटे मुरायला बाजूला ठेवावे.
कृती : १ & १/२" कणकेचा गोळा घेऊन तो थोडासा लाटून घ्यावा. त्यात २" मोठा सारणाचा गोळा ठेवावा व सगळ्या बाजूंनी कणीक वर आणून वरून बंद करावे. हाताने थोडे दाबावे व दोन्ही बाजूंस गव्हाचे पीठ लाऊन, पोळपाटावर काही मि. मी. जाड लाटावे. आता लाटलेला परोठा गरम तव्यावर दोन्ही बाजूंनी भाजावा. भाजताना दोन्ही बाजूंवर १/२ टीस्पून तेल सोडावे व गुलाबी रंगावर खमंग भाजावे. असेच उरलेल्या कणकेचे व सारणाचे ही परोठे करावेत. लोणी, दही, व लोणच्याबरोबर गरम गरम खायला द्यावेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा