शुक्रवार, १० एप्रिल, २०१५

साबूदाण्याची खिचडी / Sabudana Khichadi

साबूदाण्याची खिचडी :

                       ही रंगीत खिचडी मी भारताच्या गणतंत्र दिवसानिमित्त आयोजिलेल्या कार्यक्रमात बनविली होती 


(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)


१. दीड वाटी साबूदाणा २ वेळा पाण्याने धुऊन पाण्यातच ५-६ तास भिजत ठेवावा. भिजविताना साबुदाण्याच्या अंदाजे १/२ सें. मी. वरपर्यंत पाणी घालावे. भिजविल्यावर साबूदाणा पाणी शोषून घेईल व फुलेल.
२. एक बटाटा घेऊन त्याचे  ४ भाग करावेत व प्रत्येक भागाचे काही मि. मी. जाड चकत्या कराव्यात.
. आता साबुदाण्यात १ वाटी दाण्याचे कूट*, चवीप्रमाणे मीठ, १ &१/२ टीस्पून साखर घालून सर्व मिसळून ठेवावे.
४. एका कढईत ४ टीस्पून तेल गरम करून त्यात १ टीस्पून जिरे, २ बारीक चिरलेल्या मिर्च्या, व चिरलेला बटाटा घालावा. (मिर्च्यांचची पेस्ट वापरली तरी चालेल. तसे केल्यास ती कृती क्रमांक ३ मधे शाबूदाण्यातच घालावी) १ मिनिट तेलावर परतून, झाकण ठेवावे व बटाटा मऊसर शिजू द्यावा.
५. आता शाबूदाणा घालून सगळे मिसळावे व गॅस बारीक ठेऊन, झाकण ठेवावे, व शाबूदाणा गुलाबी रंगाचा होईपर्यंत १० मिनिटे शिजू द्यावा. जर शाबूदाणा ओलसर असेल (कधी कधी शाबूदाणा पाणी पूर्ण शोषून घेत नाही), तर झाकण ठेऊ  नये. दर २-३ मिनिटांनी हलवावे व तळाला करपू देऊ नये.

गॅस ऐवजी मायक्रोवेव वापरल्यास तळाला लागायची भिती राहात नाही. तसे करायचे असल्यास, तेलात शाबूदाणा घातल्यावर सगळे मिसळून एका मायक्रोवेव-सेफ भांड्यात घालून (झाकून किंव्हा न झाकता), गुलाबी होईपर्यंत १० मिनिटे शिजवावे. मात्र तेंव्हा ही दर २-३ मिनिटांनी हलवावे.
६. वरून ताजे खोवलेले ओले खोबरे, व बारीक चिरलेली कोथिंबीर घालून खायला द्यावे. बरोबर लिंबाचे गोड/उपासाचे लोणचे ही वाढावे.  

*शेंगदाणे भाजून सालं काढून घ्यावेत व मिक्सर मध्ये भरड दळावेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा