पालकाचे सूप (४-५ जणांसाठी साठी)
(सामग्री रेखांकित केली आहे)
चार वाट्या पालकाची पाने धुऊन घ्यावीत. एका वाटीत २ टीस्पून तांदुळाची पिठी, २ टेबल्स्पून पाण्यात मिसळून घ्यावी. एका भांड्यात, १ टेबलस्पून लोणी/बटर गरम करून त्यात ३ लवंगा, १" दालचीनी चा तुकडा, १ तमालपत्र, व ५-६ कढिलिंबाची पाने टाकावीत. थोडे परतल्यावर १ मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा, चार बारीक चिरलेल्या लसणाच्या पाकळ्या व १/४ टीस्पून बारीक चिरलेले आले टाकावे. थोडे परतल्यावर त्यात १ हिरवी मिरची व चिरून पालकाची पाने टाकावीत. २ मिनिटे परतल्यावर ४ वाट्या पाणी घालावे व ५-६ मिनिटे शिजू द्यावे. गार झाल्यावर त्यातील लवंगा, दालचीनी व तमालपत्र काढून टाकावे व शिजलेली पालकाची पाने मिक्सर मध्ये पूर्ण वाटून घ्यावीत. वाटलेली पालकाची पाने व गाळलेले पाणी एका भांड्यात मिसळून मंद विस्तवावर ठेवावे. त्यात चवीप्रमाणे मीठ व काळ्या मिऱ्याची पूड घालून ७-८ मिनिटे शिजवावे. त्यात आधी तयार केलेले तांदुळाच्या पिठीचे पाणी घालावे व सूप दाट होईपर्यंत हलवावे. गॅस बंद करून गरम गरम प्यायला द्यावे. वरून आवडत असल्यास थोडे फ्रेश क्रीम व तळलेले ब्रेडचे तुकडे घालावेत .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा