मंगळवार, २८ एप्रिल, २०१५

फ्लॉवर बटाटा रस्सा / Flower Batata Rassa

फ्लॉवर बटाटा रस्सा :


(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)

१. एका कढईत ४ टीस्पून तेल गरम करावे व त्यात १/२ टीस्पून मोहरी घालावी. मोहरी तडतडल्यावर त्यात १/२ टीस्पून जिरे१/४ टीस्पून हिंग, व १/२ टीस्पून हळद घालावी. 

२. त्यात बटाट्यांचे मोठे तुकडे ३ वाट्या घालावेत. एकदा सर्व मिसळून त्यात बटाटे बुडतील एवढे पाणी घालावे. झाकण ठेवून अंदाजे पाच मिनिटांपर्यंत बटाटे अर्धवट शिजू द्यावेत. 

३. आता त्यात २ वाट्या फ्लॉवरचे मोठे मोठे तुकडे घालावेत व आता फ्लॉवरच्या फोडीही बुडतील इतके आणखीन थोडे पाणी घालावे. त्यात ४ टेबलस्पून काळा/गोडा मसाला, १/२ टीस्पून धन्याची पूड, १/२ टीस्पून जिऱ्याची पूड, २ टेबलस्पून गूळचवीप्रमाणे मीठ, व चवीप्रमाणे तिखट घालावे व परत झाकण ठेउन अंदाजे ५ मिनिटांपर्यंत पूर्ण शिजू द्यावे. 

४. झाकण काढून ५-६ बटाटाच्या फोडी बाजूला काढून चुरडून घ्याव्यात व परत रस्स्यात मिसळाव्यात.  ह्यामुळे रस जरा दाटसर व्हायला मदत होईल. आवडत असल्यास दाटपणासाठी १-२ टेबलस्पून दाण्याचे कूट (पर्यायी) घातले तरी चालेल. 

५. आता एका टोमॅटोचे मोठे तुकडे करून रस्स्यात घालावेत व २-३ मिनिटे झाकण न ठेवता उकळू द्यावे. मग गॅस बंद करावा. 

६. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी व गरम रस्सा पोळी/फुलका किंव्हा भाताबरोबर वाढावा. 

मुळ्याची कोशिंबीर / Mulyachi Koshimbir

मुळ्याची कोशिंबीर :




(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)

  1. एक टीस्पून मुगाची डाळ थोड्या पाण्यात १/२ तास भिजत घालावी. 
  2. एक वाटी किसलेला किंव्हा बारीक कोचालेला मुळा घ्यावा व दोन्ही हातांमधे दाबून त्यातील पाणी काढून टाकावे. 
  3. एका कढईत २ टीस्पून तेल गरम करावे व त्यात १ टीस्पून जिरेएक चिमूटभर हिंग, व १ उभी चिरलेली मिर्ची घालावी व एखादा मिनिट परतावे. ही फोडणी मुळ्यात घालावी. 
  4. भिजविलेल्या डाळीतले पाणी काढून टाकावे व डाळ मुळ्यात मिसळावी. 
  5. त्यात चवीप्रमाणे मीठ, १/२ टीस्पून साखर, व २ टीस्पून लिंबाचा रस  घालून सर्व मिसळावे. 
  6. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून ही कोशिंबीर पोळी भाजीच्या जेवणात वाढावी. 


चपट्या शेंगाची भाजी / Chaptya shengachi bhaji

चपट्या शेंगाची भाजी :


(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)

१. सर्व शेंगांच्या शिरा काढून त्या स्वच्छ धुऊन घ्याव्यात. 

२. शेंगांचे बारीक अंदाजे १ सें. मी. मोठे तुकडे करून घ्यावेत. 

३. दोन वाट्या शेंगांसाठी एका कढईत २ टीस्पून तेल गरम करावे. त्यात १/२ टीस्पून मोहरी घालावी. मोहरी तडतडल्यावर त्यात १/२ टीस्पून जिरे, एक चिमूटभर हिंग, व १/२ टीस्पून हळद घालावी. 

४. त्यात चिरलेल्या शेंगा घालून सर्व मिसळावे. 

५. चवीप्रमाणे मीठ, १/२ टीस्पून साखर, व २ हिरव्या मिरच्या बारीक चिरून किंव्हा ठेचून घालाव्यात. 

६. झाकण ठेऊन ५-७ मिनिटे शिजू द्यावे. शेंगा जवळ जवळ शिजत आल्यावर त्यात १/२ टीस्पून धन्याची पूड, व १/२ टीस्पून जिऱ्याची पूड घालून परत झाकण ठेऊन ५-७ मिनिटांपर्यंत पूर्ण शिजू द्यावे व गॅस बंद करावा. 

७. वरून ताजे खोवलेले खोबरेबारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरम भाजी पोळीबरोबर वाढावी. 

शनिवार, २५ एप्रिल, २०१५

झटपट ढोकळा / Jhatpat Dhokla

झटपट ढोकळा :


(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)

१. एका पातेल्यात १ मोठी वाटी डाळीचे  पीठ घेऊन त्यात १/४-१/२ टीस्पून citric  acid किंव्हा २ टेबलस्पून लिंबाचा रस, २ टीस्पून साखर, व चवीप्रमाणे मीठ (अंदाजे १/२ टीस्पून) घालावे. १/४ वाटी पाणी घालून सर्व एकसारखे मिसळावे. गोळे होऊ देऊ नयेत. 


२. कुकर मध्ये पाणी घालून उकळायला ठेवावे. आता वरील मिश्रणात १/४-१/२ टीस्पून बेकिंग  सोडा (सोडियम बायकार्बनेट) घालावा व एकाच दिशेने भरभर फेटावे. पीठ हलके होउन फसफसायला हवे. 


३. तेल लावलेल्या एका कुकर च्या  भांड्यात हे सर्व मिश्रण ओतून प्रेशर न ठेवता झाकण लावावे आणि १५ मिनिटे शिजू द्यावे. झाकण उघडून शिजलेला ढोकळा गार व्ह्यायला बाहेर काढून ठेवावा. 


४. एका छोट्या कढईत १/२ टीस्पून बारीक मोहरी (राई) व १/४ टीस्पून हिंग घालून फोडणी करावी. गॅस बारीक करून त्यातच १ टेबलस्पून पाणी घालावे व पाण्याला उकळी आणावी. व गॅस बंद करावा. 


५. कुकर मध्ये तयार झालेला ढोकला चांगला गार झाल्यावर त्याचे चौकोनी काप करावेत आणि गार झालेले फोडणीचे पाणी त्यावर घालावे. ५ मिनिटे ठेवल्यावर हलक्या हाताने ढोकळ्याचे काप  बाहेर काढावेत. 


६. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर, व आवडत असल्यास ओले खोवलेले खोबरे घालून, खाली दिलेल्याप्रमाणे खमंग मिर्च्यांबरोबर खायला द्यावेत. 

 

खमंग मिर्च्यांसाठी:

१. ४ मोठ्या हिरव्या मिर्च्या उभ्या चिरून आतील बिया काढून टाकाव्यात. 

२. एका कढईत २ टीस्पून तेल गरम करून त्यात वरील तयार केलेल्या मिर्च्या घालाव्यात व थोडे परतावे. 

३. त्यातच २ टीस्पून लिम्बाचा रस व चवीप्रमाणे मीठ घालून झाकण ठेवावे व २ मिनिटे शिजू द्यावे. मिर्च्या मऊसर झाल्यावर गॅस बंद करावा. 

४. खमंग मिर्च्या ढोकाळ्याबरोबर फार चविष्ट लागतात. 

मसाला डोसा / Masala Dosa

मसाला डोसा :



(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)

डोस्यासाठी :

१. ३ वाट्या तांदूळ, १/२ वाटी पोहे, ६ वाट्या पाण्यात भिजत टाकावेत. तसेच १ वाटी उडदाची डाळ व १ टेबलस्पून मेथी दाणे २ वाट्या पाण्यात भिजत टाकावेत. दोन्ही ७-८ तास भिजत ठेवावे. 

२. तांदूळ व डाळ भिजल्यावर मिक्सर मध्ये वेगवेगळे बारीक वाटावेत. 

३. आता दोन्ही मिसळावे व एका उंच पातेल्यात आंबण्यासाठी ८-९ तास उबदार ठिकाणी झाकून ठेवावे. पातेल्यात पीठ फुगून वर येण्यासाठी भरपूर जागा ठेवावी. 

४. आंबलेले पीठ फसफसून वर येईल.  ते सर्व मिसळावे व थोडे पाणी घालून तव्यावर पसरता येईल इतपत पातळ करावे.  चवीप्रमाणे मीठ घालावे. 

मसाल्यासाठी :


१. मध्यम आकाराचे ४ बटाटे घेऊन सोलून घ्यावेत व हातानेच त्यांचे छोटे छोटे तुकडे करावेत. पूर्ण कुस्करु नयेत. 

२. एका कढईत ४ टीस्पून तेल घ्यावे व गरम करून त्यात १/२ टीस्पून मोहरी घालावी. 

३. मोहरी तडतडल्यावर त्यात चिमूटभर हिंग, १/२ टीस्पून हळद, ३-४ कढिलिंबाची पाने, व एक छोटा कांदा बारीक चिरून घालावा. कांदा पारदर्शक होईपर्यंत परतावे. 

४. आता बटाटे घालून सर्व मिसळावे. गॅस बारीक करावा व चवीप्रमाणे मीठ घालावे. सर्व मिसळून २ मिनिटांनी गॅस बंद करावा. 

कृती :

१. गरम तव्यावर अंदाजे २ टेबलस्पून पीठ तव्याच्या मधोमध घालावे व एका पळीने गोलगोल बाहेरच्या बाजूस पसरून पातळ व गोल डोसा पसरावा. 

२. डोस्यावर कडेला व मधे १/२ टीस्पून तेल पसरावे. 

३. थोडी मोळगापोडी डोस्यावर पसरावी. 

४. डोस्याची खालची बाजू गुलाबी होईपर्यंत शिजू द्यावे. 

५. डोस्याच्या मध्ये २ टेबलस्पून बटाट्याचा मसाला घालून डोसा दोन्ही बाजूंनी दुमडावा. 


६. गरम डोसा नारळाची चटणी व सांभार बरोबर वाढावा. 

गुरुवार, २३ एप्रिल, २०१५

दडपे पोहे / Dadpe Pohe

दडपे पोहे :


(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)

१. दोन  वाट्या पातळ पोहे घेऊन त्यात ३ टेबलस्पून बारीक चिरलेला कांदा, २ टेबलस्पून ताजे खोवलेले खोबरे, २ टीस्पून लिंबाचा रस, १ टीस्पून साखर, व चवीप्रमाणे मीठ घालून सर्व मिसळावे. 


२. पोह्यांवर घट्ट झाकण ठेऊन पोहे निदान १५ मिनिटांसाठी दडपून ठेवावेत. झाकणामधे व पोह्यांमधे कमीतकमी जागा असावी. 


३. एका छोट्या कढईत २ टीस्पून तेल गरम करावे व त्यात १/२ टीस्पून मोहरी घालावी. मोहरी तडतडल्यावर त्यात १/२ टीस्पून  जिरे,१/४ टीस्पून हिंग, १ टीस्पून हळद, ४-५ कढिलिंबाची पाने, २ उभ्या चिरलेल्या हिरव्या मिर्च्या, व २ टेबलस्पून कच्चे दाणे घलावीत . दाणे तपकिरी होईपर्यंत परतावे. 

४. गॅस बंद करून वरील फोडणी दडपून ठेवलेल्या पोह्यांवर घालावी व सर्व मिसळावे. 


५. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून दडपे पोहे खायला द्यावेत. 


साबुदाणा वडा / Sabudana Vada

साबुदाणा वडा  :




(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)

१. २ वाट्या साबुदाणा ३-४ तास पाण्यात भिजत ठेवावा. भिजण्यासाठी साबुदाण्याच्या किंचित वरपर्यंत पाणी ठेवावे. भिजल्यावर साबुदाणा पाणी शोषून घेईल व फुलून वर येईल. 



२. १/४ वाटी वऱ्याचे तांदूळ, ३/४ वाटी पाणी घालून मंद आचेवर भाताप्रमाणे शिजवून घ्यावेत व गार झाल्यावर भिजलेल्या साबुदाण्यात घालावेत. 

शिजलेले वऱ्याचे तांदूळ 

३. दोन बटाटे उकडून सालं काढून घ्यावेत व कुस्करून साबुदाण्यात मिसळावेत. ४-५ हिरव्या मिर्च्या, चवीप्रमाणे मीठ, व ३ टीस्पून साखर घालावी. 

४. जरुरीप्रमाणे पाणी घालून कणकेप्रमाणे पण हलक्या हाताने सर्व मळून घ्यावे. 




५. आता पिठाचे एकसारखे छोटे छोटे गोळे करून चपटे करावेत व प्रत्येक वड्याला मध्ये बोटानी एक भोक पाडून घ्यावे. 

६. एका कढईत तेल गरम करून सर्व वडे सोनेरी रंगापर्यंत तळून काढावेत व शेंगदाण्याच्या चटणी बरोबर किंव्हा केचप बरोबर गरम गरम खायला द्यावेत. 

मटार पोहे / Matar Pohe

मटार पोहे :


(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)

१. २ वाट्या मध्यम जाडीचे पोहे एका रोळीत पाण्याने धुऊन निथळायाला ठेवावेत. 


२. १/४ वाटी मटार थोडे पाणी घालून मायक्रोवेव मधे ३ मिनिटे शिजवून घ्यावेत. 

३. एका कढईत ४ टीस्पून तेल गरम करून त्यात १ टीस्पून मोहरी घालावी. मोहरी तडतडल्यावर त्यात १/४ टीस्पून हिंग, १ टीस्पून हळद, ५-६ कढिलिंबाची पाने, ४ उभ्या चिरलेल्या हिरव्या मिर्च्या, व १ बटाटा खाली दाखाविलेल्या प्रमाणे त्रिकोणी काप करून घालावा. 

४. झाकण ठेऊन बटाटा पूर्ण शिजू द्यावा. 

५. आता १ बारीक चिरलेला कांदा घालून तो गुलाबी होईपर्यंत परतावा. 

६. त्यावर भिजविलेले पोहे घालून सर्व चांगले मिसळावे व गॅसअगदी बारीक करून ठेवावा. 

७. शिजविलेले मटार, चवीप्रमाणे मीठ, २ टीस्पून साखर२ टीस्पून लिंबाचा रस घालावा. 

८. दोन मुठी पाणी पोह्यांवर शिंपडावे व झाकण ठेऊन ५-७ मिनिटे अगदी बारीक गॅस वर शिजू द्यावे. दर २ मिनिटांनी हलवायला विसरू नये. 

९. वरून ताजे खोवलेले खोबरे, बारीक चिरलेली कोथिंबीर, व बारीक शेव घालून गरम गरम पोहे खायला द्यावेत. 



दाल मखनी / Dal Makhani

दाल मखनी  :



(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)

१. ३/४ वाटी उडीद, १/४ वाटी मसूर, व १/४ वाटी राजमा, ५-६ तास पाण्यात भिजत घालावा. 

२. मग ३ वाट्या पाणी घालून प्रेशर कुकर मधे ३ शिट्ट्या होईपर्यंत शिजवावा. तीन शिट्ट्या झाल्यावर गॅस बारीक करून १५ मिनिटे ठेवावा. 

३. १ छोटा कांदा, १ मोठा टोमॅटो, १ टेबलस्पून लसणाच्या पाकळ्या, व १ & १/२" आल्याचा तुकडा घेऊन मिक्सर मध्ये बारीक वाटून ग्रेवी तयार करावी. 

४. एका पातेल्यात ४ टीस्पून लोणी गरम करावे व त्यात वर बनविलेली ग्रेवी घालावी. त्यातच १ & १/२ टीस्पून गरम मसाला घालावा. ग्रेवी तपकिरी रंगाची होईपर्यंत, व कडेनी तेल सुटायला लागेपर्यंत परतावी. 

५. त्यात आधी शिजविलेल्या उसळी, चवीप्रमाणे मीठ व तिखट घालून हवे तेवढे पाणी घालावे. शक्यतो ही डाळ दाट असते. त्यामुळे जास्त पाणी घालू नये. 

६. एक उकळी आणून गॅस बंद करावा. 

७. वरून थोडे लोणी किंव्हा फ्रेश क्रीम घालून गरम गरम मखनी पोळी/फुलक्याबरोबर वाढावी. 



झटपट दाण्याची चटणी / Quick Peanut Chutney

झटपट दाण्याची चटणी :


(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)

१. १ टेबलस्पून दही घेऊन त्यात  १/२ वाटी दाण्याचे कूट घालून मिसळावे. 

२. त्यात चवीप्रमाणे मीठ, तिखट१/२ टीस्पून जिऱ्याची पूड घालावी. 

३. ही चटणी उपासाला चालते व शाबूदाणा वडे किंव्हा शाबुदाण्याच्या थालीपिठाबरोबर छान लागते. 


बटाट्याची उपासाची भाजी / batatyachi upasachi bhaji

बटाट्याची उपासाची भाजी :


(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)

१. चार बटाटे उकडून सालं काढून घ्यावेत. 

२. एका कढईत ३ टीस्पून तेल गरम करून त्यात १/२ टीस्पून जिरे घालावेत. जिरे चुरचुरल्यावर  त्यात ३ हिरव्या मिर्च्या  बारीक तुकडे करून घालाव्यात. 

३. त्यावर बटाट्याच्या फोडी, व २ टेबलस्पून दाण्याचे कूट घालावे व सर्व सारखे करावे. 

४. चवीप्रमाणे मीठ, १ टीस्पून साखर घालून एखादा मिनिट परतावे. 

५. ही भाजी उपासाच्या दिवशी वऱ्याचे तांदूळ व दाण्याच्या आमटी बरोबर वाढावी. 

बुधवार, २२ एप्रिल, २०१५

वऱ्याचे तांदूळ व दाण्याची आमटी / Varyache tandul wa danyachi amti

वऱ्याचे तांदूळ व दाण्याचीआमटी :


(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)

तांदुळासाठी :


१. एक वाटी  वऱ्याचे तांदूळ धुऊन घ्यावेत व त्यात ४ वाट्या पाणी घालून मध्यम आचेवर उकळायला ठेवावेत. 

२. पाणी उकळून तांदुळापर्यंत आल्यावर गॅस बारीक करावा व झाकण ठेऊन पूर्ण पाणी अटेपर्यंत शिजवावे. 

आमटीसाठी :


१. एक वाटी दाण्याचे कूट घेऊन त्यात लागेल तसे पाणी घालून बारीक पेस्ट करून घ्यावी. 

२. त्यात ३ वाट्या पाणी घालून थोड्यावेळ बाजूला ठेवावे. 

३. एका पातेल्यात २ टीस्पून तेल गरम करून त्यात १/२ टीस्पून जिरे घालावेत. जिरे चुरचुरल्यावर त्यात ३/४ वाटी पाणी घालावे. 

४. त्यातच ४-५ वाळलेली आमसुले घालून उकळी आणावी व ३-४ मिनिटे उकळू द्यावे. 

५. आता वर तयार केलेली दाण्याच्या कुटाची पेस्ट त्यात घालावी व गॅस बारीक करावा. 

६. चवीप्रमाणे मीठ व तिखट घालावे व मधे मधे हलवत आमटीला उकळी आणावी. 

वाढण्यासाठी :

गरम गरम वऱ्याचे तांदूळ दाण्याच्या आमटी बरोबर वाढावेत. सोबत उपासाचे गोड लोणचे, बटाट्याचे किंव्हा साबूदाण्याचे पापड, व बटाट्याची उपासाची भाजी ही वाढावी. 

फ्लॉवर-बटाटा भाजी / cauliflower-batata bhaji

फ्लॉवर-बटाटा भाजी :

(सर्व सामग्री रेखांकित केली आहे) 

१. दोन वाट्या फ्लॉवर मोठा मोठा चिरून घ्यावा. 

२. एक बटाटा घेउन त्याच्या मोठ्या फोडी करून घ्याव्यात. 

३. एका कढईत २ टीस्पून तेल गरम करावे व त्यात १/२ टीस्पून मोहरी घालावी. मोहरी तडतडल्यावर त्यात चिमूटभर हिंग, व १/२ टीस्पून हळद घालावी. 

४. त्यावर बटाट्याच्या फोडी घालून थोड्या परताव्यात व झाकण ठेऊन अर्धवट शिजू द्याव्यात. 

५. आता फ्लॉवरच्या फोडी, व २ बारीक ठेचलेल्या मिर्च्या घालून, झाकण ठेवावे. गॅस बारीक ठेऊन बटाटे व फ्लॉवर पूर्ण शिजू द्यावेत. मधे मधे हलवायला विसरू नये. 

५. चवीप्रमाणे मीठ, १/२ टीस्पून धान्याची पूड, १/२ टीस्पून जिऱ्याची पूड घालून मिसळावे व झाकण न ठेवता २ मिनिटे परतावे. 

६. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी व गरम भाजी पोळीबरोबर वाढवी. 

बुधवार, १५ एप्रिल, २०१५

भाज्यांचा परोठा / Bhajyancha (Vegetable) Parotha

भाज्यांचा परोठा :


(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)

सारणासाठी :

१. सारणासाठी १/२ वाटी सालं काढून किसलेली गाजरं, १/२ वाटी भरड वाटलेले मटार, १/२ वाटी भरड वाटलेली पत्ता कोबी, व १/२ वाटी भरड वाटलेल्या फरसबीच्या शेंगा, वापराव्यात. एकसारखे व भरड वाटण्यासाठी फूड प्रोसेसरचा वापर केल्यास उत्तम. 


२. एका कढईत १ टेबलस्पून तेल गरम करावे व त्यात १ टीस्पून जिरे, १/४ टीस्पून हिंग, १/४ टीस्पून हळद, १/२ टीस्पून आल्याची पेस्ट, २ टीस्पून लसणाचे बारीक तुकडे, व १ छोटा कांदा बारीक चिरून घालावा. 

३. कांदा व लसूण गुलाबी होईपर्यंत परतावे व त्यात १ टीस्पून गरम मसाला घालून आणखीन थोडे परतावे. 

४. आता वरील सर्व भाज्या घालून मिसळावे. चवीप्रमाणे मीठ व हिरव्या मिर्च्यांची पेस्ट किंव्हा तिखट, व १/२ टीस्पून आमचूर घालावे. 

५.  सर्व मिसळून साराणातला ओलसरपणा जाईपर्यंत, मध्यम आचेवर वरचेवर हलवत, परतावे. 


६. गार होण्यासाठी बाजूला ठेवावे. 

कणकेसाठी :


१ & १/२ वाटी कणीक, १/२ टीस्पून मीठ, १ टीस्पून तेल, हे सर्व एकत्र मिसळावे. आता पाण्याने पोळ्यांच्या कणकेप्रमाणे कणीक भिजवावी.

कृती :

१. कणकेचा ३" गोळा घेऊन थोडा लाटून घ्यावा. त्यात २-२ & १/२ टेबलस्पून सारण घालावे. सगळीकडून बंद करून वरूनही तोंड बंद करावे. हातानी थोडे चपटे करून त्याचा गोल १/२-३/४ सें.मी. जाड परोठा लाटावा. 

 

२. गरम तव्यावर  १/४ चमचा तेल सोडून, दोन्ही बाजूंनी भाजावा. 


३. लोणी, दही व लोणच्याबरोबर गरम गरम खायला द्यावा. 


पचडी / Pachadi

पचडी :


(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)

१. १/४ वाटी बारीक चिरलेली कांद्याची पात, १/४ वाटी किसलेले गाजर, १/४ वाटी कोचालेली काकडी, सर्व एकत्र मिसळावे. 

२. त्यात २ टेबलस्पून दाण्याचे कूट घालावे. 

३. एका छोट्या काढईत २ टीस्पून तेल गरम करून त्यात १/४ टीस्पून जिरे, चिमूटभर हिंग, व १ उभी चिरून मिर्ची घालून एखादा मिनिट परतावे. 

४. वरील फोडणी चिरलेल्या भाज्यांवर घालून त्यात चवीप्रमाणे मीठ, १ टीस्पून साखर, व १ टीस्पून लिंबाचा रस घालून सगळे मिसळावे. 

५. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी व तयार पचडी पोळीबरोबर वाढावी. 

दूधभोपळ्याची भाजी (टोमॅटो घालून) / Doodhbhoplyaachee bhaji

दूधभोपळ्याची भाजी (टोमॅटो घालून) :


(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)

१. दूधभोपळ्याची सालं काढून त्याची १"x १" मोठे काप करून घ्यावेत. चिरताना मधल्या जून व मोठ्या बिया काढून टाकाव्यात. 

२. १ वाटी चिरलेला दूधभोपळा घ्यावा. एका कढईत २ टीस्पून तेल गरम करावे. त्यात १/४ टीस्पून मोहरी घालावी. मोहरी तडतडल्यावर त्यात चिमूटभर हिंग, १/४ टीस्पून हळद, ४ लवंगा, व १" मोठा दालचीनीचा तुकडा घालावा. थोडेसे परतावे. 

३. त्यावर चिरलेला दूधभोपळा घालावा. त्यात १/४ टीस्पून धन्याची पूड, १/४ टीस्पून जिऱ्याची पूड, १/४ वाटी पाणी व चवीप्रमाणे मीठ व तिखट घालावे. 

४. झाकण ठेऊन फोडी मऊ होईपर्यंत शिजवावे. 

५. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. 

६. दूधभोपळ्याची भाजी गरम पोळी किंव्हा फुलक्याबरोबर वाढावी.  

मंगळवार, १४ एप्रिल, २०१५

दूधभोपळ्याची भाजी / Lauki (Bottle Gourd) Ki Sabzi (Maharashtrian style)

दूधभोपळ्याची भाजी :


(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)

१. दूध भोपळ्याची सालं काढून त्याचे १" x १" मोठे तुकडे करून घ्यावेत. 

२. १ वाटी चिरलेल्या दूधभोपळ्यासाठी १ टेबलस्पून हरभऱ्याची डाळ, १/४ वाटी पाण्यात १/२ तास भिजत ठेवावी. 

३. एका कढईत २ टीस्पून तेल गरम करून त्यात १/४ टीस्पून मोहरी घालून ती तडतडू द्यावी. व मग त्यात एक चिमूटभर हिंग, व १/४ टीस्पून हळद घालावी. 

४. त्यात भिजविलेली डाळ व चिरलेला भोपळा घालावा व सर्व मिसळावे. 

५. त्यात २ टीस्पून गोडा मसाला / काळा मसाला, चवीप्रमाणे मीठ व तिखट, व १ टेबलस्पून गूळ घालावा. १/४ वाटी पाणी घालून सर्व मिसळावे व झाकण ठेऊन फोडी मऊ होईपर्यंत शिजवावे. 

६. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. 

७. दूधभोपळ्याची भाजी पोळी किंव्हा फुलक्याबरोबर वाढावी. 


दूधभोपाळ्याचे कोफ्ते / Dudhbhoplyache Kofte

दूधभोपाळ्याचे कोफ्ते :


(सर्व सामग्री रेखांकित केली आहे)

१. दूध भोपळ्याची सालं काढून घ्यावीत व बारीक किसणीने दूधभोपळा किसून घ्यावा. चिरताना मधल्या जाड मोठ्या बिया काढून टाकाव्यात. पुढील कृतीसाठी १ वाटी किसलेला दूधभोपळा घ्यावा. 


२. दोन्ही हातांमधे दाबून दूधभोपळ्याचे पाणी काढून टाकावे.  

३. त्यात ४ टेबलस्पून डाळीचे पीठ (बेसन), १/२ टीस्पून जिऱ्याची पूड, व चवीप्रमाणे मीठ व तिखट घालावे. 

४. सगळे मिसळून त्याचे अंदाजे १" मोठे गोळे करावेत. 


५. एका कढईत तळण्यासाठी तेल गरम करावे व त्यात वरील गोळे सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळावेत व  तळलेले कोफ्ते एका पेपर टॉवेल वर काढावेत. 


६. एका कढईत  ४ टेबलस्पून तेल गरम करावे व त्यात १ टीस्पून जिरे, १ बारीक चिरलेला कांदा, १/२ टीस्पून आल्याची पेस्ट, १ टीस्पून लसणाची पेस्ट, व २ टोमॅटो बारीक चिरून घालावेत. २ टीस्पून गरम मसाला घालावा. सर्व बाजूंनी तेल सुटेपर्यंत परतावे. 

७. चवीप्रमाणे मीठ व लाल तिखट घालावे. मीठ व तिखट ग्रेव्ही पुरतेच घालावे कारण कोफ्त्यांमधे वेगळे मीठ व तिखट आहेच. १ मिनिट परतून १/२ वाटी पाणी घालावे. 

८. ह्या ग्रेव्हीत तळलेले कोफ्ते घालावेत व हलक्या हाताने सर्व मिसळावे. २ मिनिटे बारीक आचेवर शिजू द्यावे व मग गॅस बंद करावा. वाढायच्या आधी निदान १/२ तास तरी कोफ्ते ग्रेव्ही मधे मुरू द्यावेत. 

९. गरम गरम कोफ्ते पोळी/फुलका किंव्हा भाताबरोबर वाढावेत.